जिल्ह्यात शाळा सुरु होतील पण…..

रत्नागिरी:– शाळा सुरु करण्यासंदर्भात परिपत्रक प्राप्त झाल्यानंतर जिल्हा परिषद शिक्षण विभागाकडून पावले उचलण्यात आली आहेत. शासनाच्या सुचनेनुसार प्राथमिक शाळांचा निर्णय शाळा व्यवस्थापन समितीवर आहे. यामुळे जिल्ह्यात किती शाळा सुरू होणार याबाबत प्रशचिन्हच आहे.
जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण वाढत आहे. ज्या गावातील चाकरमान्यांचा विलगीकरण कालावधी संपुष्टात आला आहे, तेथील शाळांचा मार्ग सुकर होऊ शकतो. प्रशासनाकडून घेण्यात आलेल्या सर्व्हेक्षणात 916 जिल्हा परिषद शाळांनी शैक्षणिक सत्र सुरु करण्यास तयारी दर्शविली होती.

15 जुनपासून शाळा, कॉलेजीस सुरु होतात; मात्र कोरोनामुळे यंदाचे शैक्षणिक सत्र लांबले आहे. त्यामुळे आज सगळ्याच शाळांच्या इमारती सुन्या- सुन्या होत्या. मुलांचे निकालही जाहीर झालेले नाहीत. शासनानेही त्याबाबत योग्य सुचना देणारे परिपत्रक काढले आहेत. शासनाच्या निर्देशानुसार शाळा सुरु करण्याचा निर्णय शाळा व्यवस्थापन समिती, कोविड प्रतिबंध समिती, स्थानिक पदाधिकारी यांच्याशी चर्चा केल्यानंतरच होणार आहे. शाळांमध्ये स्वच्छता, निर्जंतुकीकरण, पाण्याची सोय आदींना प्राधान्य दिले जाणार आहे. फिजिकल डिस्टन्सिंगला प्राधान्य दिले जाणार आहे. बालवाडीसह पहिली, दुसरीच्या मुलांमध्ये या गोष्टी अंगवळणी टाकणे सध्यातरी शक्य नाही. लहान मुलांना सर्वाधिक बाधा होणार असल्यामुळे त्यांच्या शिक्षणाची व्यवस्था करताना आरोग्यचा विचार करावा लागणार आहे.

रत्नागिरी जिल्ह्यात मुंबई, पुण्यासारख्या रेडझोनमधून सुमारे दीड लाख चाकरमानी गावी दाखल झाले आहेत. त्यातील सुमारे चारशे जणांना कोरोनाची बाधा झाली होती. सध्याच्या परिस्थितीत 60 टक्केहून अधिक रुग्ण बरे झाले आहेत. कोरोनाच्या कालावधीत आलेल्यांना विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. सध्या पन्नास हजार लोकंच विलगीकरणात आहेत. कोरोनाची गावागावात भिती निर्माण झालेली असून त्यावर मात करण्याचे आव्हान शिक्षण विभागापुढे आहे. कमी पट असल्यामुळे ग्रामीण भागातील शाळांमध्ये प्रश्‍न उद्भवणार नाही; मात्र शहरातील प्राथमिक शाळांमध्ये अनेक अडचणी निर्माण होणार आहेत. लहान मुले एकमेकांच्या संपर्कात येत असल्यामुळे त्यातून संसर्ग होण्याची शक्यता अधिक राहणार आहे.