रत्नागिरी:- जागतिक संकट असलेल्या कोरोनाला रोखण्यासाठी राज्यातल्या प्रत्येक ग्रामीण भागात देखील प्रयत्न सुरु आहेत. रत्नागिरीत मुंबईतुन आलेल्या चाकरमान्यांमुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागला. आलेल्या चाकरमान्यांची होणारी गैरसोय दुर करण्यासाठी प्रशासनाकडून ग्राम कृतीदल स्थापना करण्यात आली आणि या माध्यमातून कोविड 19 विरोधात युद्ध सुरु झाले. अनेक ग्रामपंचायती या युद्धात सहभागी झाल्या. रत्नागिरीतील ग्रुप ग्रामपंचायत डोर्ले देखील या युद्धात मागे राहीली नाही. मुंबईतून येणारे चाकरमानी हे देखील आपलेच आहेत ही भावना जपून या चाकरमान्यांची योग्य ती व्यवस्था डोर्ले ग्रामपंचायतीने केली.
मुंबईत कोरोनाची वाढती संख्या लक्षात घेता डोर्ले गावातील चाकरमानी आपल्या सुरक्षित असणा-या गावी दाखल झाले. या चाकरमान्यांना होम क्वारंटाईन करुन त्यांची ग्रामपंचायतीनं वेळोवेळी काळजी घेतली. त्यांची खाण्याची गैरसोय होऊ नये यासाठी त्यांना रेशन उपलब्ध करुन दिले. जवळपास 300 चाकरमानी डोर्ले गावात दाखल झालेत. गावातील बंद घर ताब्यात घेऊन त्या ठिकाणी चाकरमान्यांना क्वारंटाईन करुन त्यांची काळजी घेतली गेली. सुदैवाने या गावात कोणीही कोरोना पाॅझीटीव्ह रुग्ण सापडला नाही. आशा सेविका ज्योती बिर्जे आणि कविता कुवार, अंगणवाडी सेविका पुजा पाटील, तृप्ती गुरव यांनी या काळात विशेष काळजी घेतली.
डोर्ले – दाभिळ गावची लोकसंख्या ही जवळपास 1 हजार 490 इतकी आहे. या गावातील ग्रामस्थांचे आरोग्य सुस्थितीत रहावे यासाठी देखील वेळोवळी प्रयत्न केले गेले. जनजागृतीसाठी वेळोवेळी स्पिकरच्या माध्यमातून जनजागृती केली गेली. ठिकठिकाणी बॅनर आणि पोस्टर देखील लावण्यात आलेत. सॅनिटाझर देखील प्रत्येक कुटूंबाला वाटण्यात आले. त्याच बरोबर मुंबईतून आलेल्या चाकरमान्यांना मास्कचं वाटप करण्यात आलं. अर्सेनिक अल्बम 30 या रोग प्रतिकारक गोळ्यांचं वाटप देखील करण्यात आले. पाणी शुद्धीकरणासाठी लिक्वीड देण्यात आले. सोशल डिस्टन्स आणि जमावबंदी होणार नाही याची खबरदारी घेण्यात आली. कुणी आजारी पडल्यास त्यांना रुग्णालयापर्यंत नेण्यासाठी वाहन सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल होती.
या कोविड युद्धात कोविड योद्धा म्हणून पंचायत समिती सदस्य सुशांत पाटकर , सरपंच शरयु पाटकर , उपसरपंच प्रकाश कुड ,ग्रामसेवक प्रविण चौधरी यांनी महत्वाची भूमिका बजावली त्याचबरोबर ग्राम कृतीदल समिती सदस्य, वाडी कृतीदल समिती सदस्य, ग्रामपंचायत सदस्य, ग्रा.प.कर्मचारी ,डोर्ले उपकेंद्रातील आरोग्य खात्याचे कर्मचारी तसेच डोर्ले व दाभिळ आंबेरे ग्रामस्थांनी देखील या युद्धात महत्वाची भूमिका बजावली.