कोकण रेल्वे कर्मचाऱ्याचा कोरोनाने मृत्यू; 52 कर्मचारी डेंजर झोनमध्ये

रत्नागिरी:- कोकण रेल्वे कर्मचार्‍याचा कोरोनाने मुंबई येथे मत्यू झाल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. या कर्मचार्‍याच्या संपर्कात आलेल्या 52 कर्मचार्‍यांची यादी रेल्वे प्रशासनाने आरोग्य विभागाला दिली असून सोमवारी सायंकाळी 29 जणांना स्वॅब टेस्टसाठी ताब्यात घेतले होते.

मिळालेल्या माहितीनुसार कोकण रेल्वेत काम करणार्‍या एका कर्मचार्‍याची प्रकृती बिघडल्याने त्याला मुंबई येथे हलविण्यात आले होते. त्या ठिकाणी त्याची कोरोना टेस्ट करण्यात आली. त्याचा कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता आणि त्या कर्मचार्‍याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. कोकण रेल्वेमध्ये सिग्नल व कम्युनिकेशन विभागात काम करणार्‍या कर्मचार्‍याला कोरोनाची लागण होऊन त्यामध्ये मृत्यू झाल्यानंतर त्याच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींची माहिती घेण्याचे काम रेल्वे प्रशासनाने सुरु केले.

कोकण रेल्वे प्रशासनाने तब्बल 52 जणांची यादी तयार करुन ती आरोग्य विभागाला दिली आहे. या 52 व्यक्ती त्या मृत कर्मचार्‍याच्या संपर्कात आल्या होत्या अशी माहिती पुढे आली असून सोमवारी सायंकाळी 29 जणांना आरोग्य विभागाने ताब्यात घेतले. त्यानुसार त्यांचे कोरोना तपासणीसाठीचे स्वॅब घेऊन या सर्वांना दामले हायस्कूल येथे क्वारंटाईन करण्यात आले.