रत्नागिरी:- आता आमचा पोटाचा प्रश्न निर्माण झाला आहे. आम्ही १५ जूनपर्यंत मुदत दिली होती मात्र त्यावर काहीच निर्णय झाला नाही. उद्या मंगळवारपासून आम्ही कोणतीही परवानगी न घेता काळ्या फिती लावून दुकाने उघडणार असल्याची माहिती नाभिक समाजाचे रत्नागिरी तालुका अध्यक्ष श्रीकृष्ण उर्फ बावा चव्हाण यांनी दिली.
२१ मे पासून महाराष्ट्रात सलून व्यवसायात शिथीलता देऊन सलून सुरु करण्यास परवानगी दिली होती. मात्र ३१ मे रोजी रात्री अचानक फतवा निघाला आणि १ जूनपासून सलून व्यवसायाला बंदी घालण्यात आली. त्या विरोधात नाभिक समाजाने आक्रमक भूमिका घेतली होती. राज्यात ठिकठिकाणी आंदोलन देखील झाले. रत्नागिरीत देखील आंदोलनाचा इशारा दिला होता मात्र प्रशासनाशी चर्चा करुन १५ जूनपर्यंत सलूनबाबत निर्णय घेण्यासाठी वेळ देण्यात आली होती.सोमवारी याबाबत कोणताच निर्णय न झाल्याने सायंकाळी उशीरा नाभिक समाजाच्यावतीने सर्व सलून व्यावसायिकांना दुकान सुरु करण्याचे आदेश बजावण्यात आले. याबाबतची माहिती देताना रत्नागिरीचे अध्यक्ष श्रीकृष्ण उर्फ बावा चव्हाण यांनी सांगितले की, आमच्या पोटापाण्याचा प्रश्न निर्माण झालाय. त्यामुळे आम्ही अंगावर गुन्हे घ्यायला तयार आहोत, मात्र आमच्या एका जरी सलून चालकावर गुन्हा दाखल झाल्यास संपूर्ण जिल्ह्यात जेल भरो आंदोलन होईल असा इशारा बावा चव्हाण यांनी दिला आहे.
जिल्ह्यात उद्यापासून सर्व सलून व ब्युटी पार्लर चालक काळ्या फिती लावून आपला व्यवसाय सुरु करणार आहेत. जिल्ह्यात ४ ते साडेचार हजार सलून तर ३ हजारच्या आसपास ब्युटी पार्लर आहेत. सर्वांना दुकाने सुरु करण्याबाबत सूचना देण्यात आल्याचे चव्हाण यांनी सांगितले. आम्ही रितसर परवानगी मागितली होती मात्र आम्हाला परवानगी नाकारण्यात आली. त्यामुळे काळ्या फिती लावून त्याचा निषेध करणार असल्याचे देखील ते म्हणाले. या लॉकडाऊनचा सर्वाधिक फटका सलून व्यावसायिकांना बसला आहे याचा गांभीर्याने विचार व्हायला हवा होता. मात्र त्याबाबत कोणताही निर्णय अद्याप झालेला नाही. यासाठी आम्ही कोणत्याही आदेशाची वाट न पाहता दुकाने सुरु करणार असल्याचे चव्हाण यांनी सांगितले.