महावितरणची पराकाष्ठा ; 3 लाख 85 हजार 623 ग्राहकांना वीजपुरवठा
रत्नागिरी:- ‘निसर्ग’ चक्रीवादळाने वीजयंत्रणाच भूईसपाट केल्याने गेले बारा दिवस वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी वीज कर्मचारी अहोरात्र परिश्रम घेत आहेत. बाधित 47 उपकेंद्रांपैकी 46 उपकेंद्रे सुरू करण्यात यश आले आहे. केळशी फाटा (ता. मंडणगड) उपकेंद्रासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा सुरूच आहे. आतापर्यंत 3 लाख 85 हजार 623 ग्राहकांचा वीजपुरवठा सुरळीत करण्यात महावितरणला यश आले आहे.
निसर्ग चक्रीवादळाच्या तडाख्यातून महावितरणला सावरण्यासाठी ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी युद्धपातळीवर यंत्रणा कार्यान्वित केली. त्यामुळे दुसर्याच दिवशी महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतून कोकणात मनुष्यबळ व विजेचे साहित्य पोहोचले. जिल्ह्यात महावितरणची 211 व ठेकेदारांची 435 कामगारांची अतिरिक्त कुमक आज रोजी कार्यरत आहे. हे सर्व मनुष्यबळ स्थानिक कर्मचार्यांच्या मदतीला धावून आल्याने आतापर्यंत 175 फिडर्स व त्यावरील 580 गावांपर्यंतचा वीजपुरवठा सुरू करण्यात यश मिळाले आहे. त्यासाठी उच्च दाबाचे 364 व लघुदाबाचे 553 खांब उभे करून 4976 रोहित्रांचा वीज पुरवठा सुरू केला आहे. आतापर्यंत बाधित 4 लाख 21 हजार 361 ग्राहकांपैकी 3 लाख 85 हजार 623 ग्राहकांचा वीजपुरवठा सुरू केला आहे तर 13 फिडर्सवरील 32 हजार 705 ग्राहकांचा वीजपुरवठा सुरू करण्याचे काम सुरू आहे.