शासकीय नोकरीच्या नावाखाली गंडा घालणाऱ्या टोळीवर दुसरा गुन्हा दाखल

अनेकांची फसवणूक; कोट्यवधींचा घोटाळा 

रत्नागिरी:- बांधकाम खात्यात नोकरी लावतो असे सांगून फसवणूक करणाऱ्या टोळी विरोधात शहर पोलीस स्थानकात दुसरा गुन्हा दाखल झाला आहे. तब्बल २ लाख २९ हजार रुपयांची फसवणूक झाली असून फसवणुकीचा आकडा कोट्यवधी रुपयांच्या घरात जाण्याची शक्यता आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार यातील तक्रारदार मोहित मारुती नार्वेकर यांची शिवाजी आण्णा वाडकर (रा.कातळवाडी,कुवारबाव) यांच्याशी ओळख आहे. बांधकाम विभागात पैसे भरून नोकरी लाऊन देतो. एक महिला प्रगती पाटील (रा.मिरजोळे पाटील वाडी) हि नोकरीला लावते. मोहित याच्या नोकरीसाठी प्रगती पाटील यांना भेटू असे सांगितले. नोकरी लागणार म्हणून मोहित याचे कुटुंबीय समक्ष भेटण्याचे ठरले होते. ३ मे २०१९ रोजी मोहित व शिवाजी वाडकर यांचा मुलगा अनिल वाडकर, यांच्या सोबत दुचाकीवरून मिरजोळे पाटील वाडी येथील प्रगती पाटील यांच्या घरी गेले होते. त्यावेळी अनिल यांनी प्रगती हिच्याशी ओळख करून दिली. त्यानंतर प्रगती हिने नोकरीचा प्रस्ताव मांडला. साई विलणकर हा माझा भाऊ असून तो सार्वजनिक बांधकाम विभागात इंजिनियर म्हणून काम करतो. त्याच्या मार्फत तुमचे काम होणार आहे. त्यावेळी प्रगती हिने मोबाईलवर फोन करून साई विलणकर यांच्याशी संपर्क करून दिला होता. त्यावेळी साई विलणकर याने सांगितले कि २ लाख ते अडीच लाख भरावे लागतील असे सांगितले होते. त्यावेळी घरच्यांना सांगून संध्याकाळी कळवितो असे मोहितने सांगितले होते.

त्यानुसार संध्याकाळी मोबाईलवरून प्रगती पाटील यांना फोन केला. मी पैसे भरण्यास तयार असल्याचे सांगितले असता प्रगती हिने पाथरे या व्यक्तिचा मोबाईल नंबर दिला होता. त्यांच्याकडे १ लाख ३० हजार रुपये भरायला सांगितले होते. त्यानंतर मोहित याने पाथरे यांना फोन केला होता. त्यावेळी प्रगती पाटील यांच्याकडे संपर्क करा असे सांगितले होते. त्यानंतर ४ मे २०१९ रोजी मोहित व त्याचे वडील १ लाख ३० हजार रुपये घेऊन प्रगती पाटील हिच्या घरी गेले होते. प्रगतीचे पती त्यावेळी घरी असताना त्यांच्या समक्ष त्यांनी १ लाख ३० हजार प्रगती पाटील यांच्याकडे दिले होते. १२ मे २०१९ रोजी पाथरे यांनी  फोन केला नोकरीसाठी आणखीन पैसे भरावे लागतील त्यावेळी अजून किती पैसे भरावे लागतील असे विचारले असता आणखी ५० हजार रुपये भरावे लागतील असे सांगितले होते. त्यावेळी वडिलांनी पुन्हा मोहित याला नोकरीसाठी ५० हजार रुपये दिले होते. ते पैसे पुन्हा प्रगती पाटील यांच्याकडे दिले. नोकरीचे काम लवकरच होईल असेही त्यांनी सांगितले होते.

दि. १५ मे २०१९ रोजी पाथरे यांनी पुन्हा फोन केला व आणखी २३ हजार रुपये भरावे लागतील असे सांगीतले होते. पुन्हा २३ हजार रुपये मोहित याने प्रगती पाटील यांच्याकडे दिले होते. त्यावेळी नोकरीबाबत विचारणा केली असता थोडे दिवस थांबा असे सांगितले. वेळोवेळी विचारणा करता आज काम होईल उद्या होईल अशी थातुरमातुर उत्तरे नेहमी देत होते. त्यावेळी मोहित हा पुन्हा प्रगती पाटील हिच्या घरी गेला होता. त्यावेळी रायकर नामक व्यक्तीशी त्यांनी ओळख करून दिली होती. रायकर हे इंजिनियर असल्याचे त्यांनी सांगितले होते. त्यावेळी रायकर यांनी तुमची फाईल माझ्या टेबलावर आली आहे. दीड महिन्यात तुमचे काम होईल असे सांगितले होते.

डिसेंबरमध्ये साई विलणकर यांनी फोन केला. तुमची फाईल आली आहे. थोडे पैसे प्रोसेसिंग फी म्हणून भरावे लागतील.१० हजार रुपये भरण्यासाठी सांगितले होते. हे पैसे मोहित याने दिले होते. ३० मार्च २०२० रोजी बँक खाते उघडण्यासाठी ६ हजार रुपये मागितले होते. हनीफ अहमद झारी यांच्या खात्यात पैसे भरायला सांगितले. त्यानुसार पैसे भरले होते. वेळोवेळी पैसे देऊनही नोकरीचा पत्ता नव्हता. सुमारे २ लाख २९ हजार एवढी रक्कम भरून हि नोकरी न मिळाल्याने आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याने मोहित मारुती नार्वेकर याने शनिवारी शहर पोलीस स्थानकात तक्रार दिली. या तक्रारीवरून पोलिसांनी प्रगती पाटील, पाथरे, रायकर, साई विलणकर यांच्या भा.द.वी.क ४२०,३४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास शहर पोलीस करीत आहेत.