मोदी सरकारची दुसऱ्या कार्यकाळातील पहिल्या वर्षात प्रभावी कामगिरी: आ.लाड

कोरोनाचा मुकाबला, गरिबांचे कल्याण, आत्मनिर्भर भारत, ऐतिहासिक निर्णय हे वैशिष्ट्य

रत्नागिरी:-पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने दुसऱ्या कार्यकाळाच्या पहिल्या वर्षात अत्यंत प्रभावी कामगिरी केली आहे. कोरोनाचा प्रभावी मुकाबला, प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेची यशस्वी अंमलबजावणी, आत्मनिर्भर भारतासाठी कल्पक उपाययोजना आणि देशातील अनेक दशकांच्या समस्या सोडविणारे ऐतिहासिक निर्णय हे या वर्षाचे वैशिष्ट्य आहे, असे प्रतिपादन मा. आमदार तसेच भा.ज.पा. प्रदेश उपाध्यक्ष श्री प्रसाद लाड यांनी रत्नागिरी येथे केले.

मोदी सरकारच्या कामगिरीची माहिती देण्यासाठी भारतीय जनता पार्टीने आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी मा आमदार तसेच भा.ज.पा. प्रदेश उपाध्यक्ष श्री प्रसाद लाड, जिल्हाध्यक्ष श्री दीपक पटवर्धन , तालुकाध्यक्ष श्री मुन्ना चवंडे , शहराध्यक्ष श्री सचिन करमरकर जिल्हा प्रसिध्दी प्रमुख श्री राजेश सावंत , सचिन वाहळकर नगरसेवक उमेश कुळकर्णी उपस्थित होते. मा. आमदार प्रसाद लाड म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताने कोरोनाच्या जागतिक साथीचा प्रभावी मुकाबला केला आहे. भारताची लोकसंख्या आणि कोविडचा सर्वाधिक फटका बसलेल्या १४ देशांची एकत्रित लोकसंख्या जवळपास सारखीच आहे. मात्र एकसारखीच लोकसंख्या असूनही १ जून २०२० ला या १४ देशांमधील एकत्रित लोकसंख्येपैकी कोविडचा संसर्ग झालेल्यांची संख्या भारताच्या २२.५ पट अधिक आहे. या १४ देशांमध्ये कोविडमुळे झालेल्या मृत्यूंची संख्याही भारतातील मत्यसंख्येच्या तुलनेत ५५.२ पट इतकी आहे. वेळीच लाग केलेला देशव्यापी लॉकडाऊन, कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी झटपट वैद्यकीय सुविधा निर्माण करणे आणि रुग्णांवर प्रभावी उपचार करण्यामुळे हे शक्य झाले आहे. पंतप्रधानांच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन जनतेने देशभरात लॉकडाऊनचे पालन केल्यामुळेच कोरोनाचा प्रसार रोखणे शक्य झाले.

ते म्हणाले की, कोरोनामुळे अर्थव्यवस्था ठप्प झाल्यामुळे झळ बसलेल्या दुर्बल घटकांना मदतीसाठी केंद्र सरकारने तातडीने १ लाख ७० हजार कोटींचे प्रधानमंत्री गरीब कल्याण पॅकेज जाहीर केले व त्याची प्रभावी अंमलबजावणी केली. आतापर्यंत सुमारे ४२ कोटी गरजूंना ५३,२४८ कोटी रुपयांची मदत देण्यात आली आहे. कोट्यवधी लोकांना मोफत धान्य, शेतकऱ्यांना खात्यात थेट पैसे जमा करणे, गरीब कुटुंबांना मोफत गॅस सिलिंडर देणे, जनधन खाते असलेल्या महिलांना तसेच गरीब ज्येष्ठ नागरिक, विधवा व दिव्यांगांना थेट आर्थिक मदत करणे असे उपाय केंद्र सरकारने केले.

त्यांनी सांगितले की, देशाची अर्थव्यवस्था पुन्हा उभी करून देश आत्मनिर्भर करण्यासाठी वीस लाख कोटी रुपयांचे पॅकेज मोदी सरकारने जाहीर केले. त्यामध्ये शेतकऱ्यांना त्यांच्या मर्जीने शेतमाल विकण्याचे स्वातंत्र्य देण्यासाठीच्या कायदेशीर सुधारणेसह अनेक महत्त्वाच्या आर्थिक सुधारणाही जाहीर करण्यात आल्या. शेतकरी, लघू उद्योजक, पथारीवाले, छोटे व्यावसायिक अशा सर्व घटकांना मदतीचा हात देऊन अर्थचक्र गतीमान करण्यासाठी मोदी सरकारने महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. या पॅकेजमुळे देश कोरोनाच्या आर्थिक संकटातून बाहेर पडेल.

ते म्हणाले की, गेल्या वर्षभरात मोदी सरकारने जम्मू काश्मीरला स्वतंत्र दर्जा देणारे घटनेचे कलम ३७० रद्द करणे, तिहेरी तलाकवर बंदी घालणे, अयोध्या येथे राम मंदिराच्या बांधकामासाठी ट्रस्ट स्थापन करून बांधकाम सुरू करणे तसेच पाकिस्तान, बांगलादेश व अफगाणिस्तानमधील पीडीत धार्मिक अल्पसख्यांकांना भारताचे नागरिकत्व देण्यासाठी नागरिकत्व सुधारणा कायदा असे महत्त्वाचे ऐतिहासिक निर्णय घेतले. गेली अनेक दशके ज्यांची देशवासियांना आस होती, असे निर्णय या सरकारने घेतले आहेत आणि दीर्घकाळ प्रलंबित प्रश्नांची सोडवणूक केली आहे.पत्रकार परिषदेस  जिल्हाध्यक्ष दीपक पटवर्धन, विधीज्ञ विलास पाटणे, सचिन वहाळकर, सचिन करमरकर, मुन्ना चवंडे, उमेश कुलकर्णी, राजू मयेकर, उपस्थित हाेते

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या दौर्‍याला पर्यटन दौरा म्हणणार्‍या मंत्री उदय सामंत यांच्या बालबुद्धीची किव करावीशी वाटते. फडणवीस हे स्वतः दापोली, मंडणगडला दौरा करून लोकांच्या हृदयापर्यंत पोहोचले. त्यांनी तत्काळ केंद्रीय पथकालाही बोलावले. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोना काळात लॉकडाऊनची स्थिती व निसर्ग चक्रीवादळाची स्थिती हाताळली नाही. घरात बसून सरकार चालवता येत नाही, असे प्रत्युत्तर भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष आमदार प्रसाद लाड यांनी सामंत यांना दिले.
त्यांचा पर्यटन दौरा होता मग मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या रायगड दौर्‍याला काय म्हणाल? ते आजही पर्यटनाकरिता रायगडला जाणार होते पण दौराच रद्द केला. सत्ताधारी योग्य रितीने वागत नसल्यानेच विरोधी पक्ष खंबीरपणे जनतेची बाजू मांडत आहे. फडणवीसांनी शेतकरी, आंबा, काजू, नारळ, सुपारी बागायतदारांची समस्या जाणून घेतली. राज्याकडून मदत पोहोचलीच नसल्याचे शेतकर्‍यांनीही सांगितले. त्यामुळे फडणवीस यांनी तत्काळ केंद्रीय पथकाला पाहणीसाठी बोलावले. हे पथक लवकरच येणार असून केंद्र सरकार मदतीसाठी खंबीर आहे.