काळ आला होता पण…परप्रांतीय तरुण थोडक्यात बचावला

रत्नागिरी:- मित्रांनी फसवले म्हणून सैरभैर झालेला परप्रांतीय तरुण दारू पिऊन निवखोल येथील इमारतीत घुसला आणि चोर समजून येथील ग्रामस्थांनी त्याचा पाठलाग करून बेदम मारहाण केल्याचा प्रकार शनिवारी राती १० वाजण्याच्या सुमारास घडला.अखेर पोलिसांना याबाबत माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेत पोलिसांनी त्या तरुणाला ताब्यात घेतले.

थिबा पॅलेस परिसरात एकत्रित राहणाऱ्या परप्रांतीय कामगारांमध्ये देवाण-घेवाणीवरून बिनसले होते. आपल्या मित्रांनीच आपल्याला फसवले असा समज करून एक परप्रांतीय तरुण दारू पिऊन तर्र झाला होता.मित्रांसोबत वाद घालून हा तरुण थिबापॅलेस परिसरातून निघून गेला तो थेट निवखोल उतारावर असलेल्या एका इमारतीमध्ये शिरला.यावेळी एका तरुणाने त्याला पाहीले होते. त्या तरुणाने त्याबाबतची माहिती त्या इमारतीमधील लोकांना देताच त्याला तेथून बाहेर काढण्यात आले. तेथून तो तरुण धावत सुटला आणि थेट निवखोल परिसरात पोहचला.

हा तरुण चोरी करण्याच्या उद्देशाने आला असावा असा समज झाल्याने येथील काही रहिवाश्यांनी त्या तरुणाचा पाठलाग केला.त्याला पकडून बेदम मारहाण करण्यात आली. दारूच्या नशेत असलेल्या त्या तरुणाला नीट माहितीही देता येत नव्हती त्यामुळे तो काहीतरी लपवतोय असा समज करून त्याला यथेच्छ मारहाण झाली होती. अखेरीस भानावर आलेल्या त्या तरुणाने आपल्याला मित्रांनी फसवलं म्हणून मी दारू पिऊन घरातून बाहेर पडल्याचे सांगितले.

हा प्रकार काहीतरी वेगळा आहे याची खात्री झाल्यानंतर पोलिसांना त्याबाबतची माहिती देण्यात आली. या माहितीवरून पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्या तरुणाला पोलिसांनी रात्री ताब्यात घेतले. पुढील चौकशी रात्री उशिरापर्यंत सुरु होती.