मच्छीमारांना सुधारित निकषांनुसार योग्य ती भरपाई देणार
दापोली:- जूननिसर्ग चक्रीवादळात मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेल्या मासेमार बांधवांना सुधारित निकषानुसार जास्तीत जास्त नुकसान भरपाई शासन देईल असे प्रतिपादन राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री श्री अस्लम शेख यांनी केले. सोबतच एलईडी मासेमारी बंदी साठी शासन कायदा आणणार असल्याचे त्यांनी सांगितले.
श्री शेख यांनी निसर्ग चक्रीवादळाने नुकसान झालेल्या भागाची पाहणी करण्यासाठी आज दापोली तालुक्यातील हर्णे बंदर, बाणकोट आणि केळशी या भागांना भेट देऊन तेथील मासेमार बांधवांशी चर्चा केली आणि नुकसानीबाबत माहिती घेतली. चक्रीवादळामुळे झालेल्या बोटींच्या नुकसानीची त्यांनी यावेळी पाहणी केली. याबाबतचे पंचनामे करताना मासेमार बांधवांच्या असणाऱ्या विमा दाव्यांवर परिणाम होणार नाही अशा पद्धतीने नुकसान भरपाई चे पंचनामे करावेत अशा सूचना त्यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांना यावेळी दिल्या. दापोलीचे उपविभागीय अधिकारी शरद पवार हे या दौर्यात त्यांच्यासमवेत होते.
केळशी येथील खाडी मधल्या गाळाचा उपसा लवकरात लवकर करण्यात यावा याबाबतही त्यांनी सर्व अधिकाऱ्यांना सूचना केल्या. मासेमार बांधवांच्या डिझेल परताव्या बाबत शासनाने गतिमान पद्धतीने काम केले असून गेल्या पाच वर्षात थकित राहिलेली रक्कम डिसेंबर 2019 पूर्वी पर्यंतचा बॅकलॉग भरत सर्वांना अदा केली आहे असेही श्री शेख म्हणाले. चक्रीवादळ आतील आधीच सर्व मासेमार बांधवांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे आहे असेही त्यांनी येथील नागरिकांशी चर्चा करताना सांगितले.