भंडारी युवा प्रतिष्ठानने जपली सामाजिक बांधिलकी; बाराशे कौले वादळग्रस्तांना पाठवली

रत्नागिरी:- इच्छाशक्ती असेल तर काहीही करता येऊ शकते, हे रत्नागिरीतील काही तरुणांनी एकवटून करून दाखवले. त्यांच्या प्रयत्नातून बाराशे कौले मोफत वाटण्यासाठी दापोलीत पाठविण्यात आली. त्यासाठी लागणारे आर्थिक सहकार्य भंडारी युवा प्रतिष्ठानसह काही महसूल कर्मचार्‍यांनी केले. मोफत कौले देण्याची ही संकल्पना महसूलचे कर्मचारी सुनील कीर यांनी यशस्वीपणे अमलात आणली.

‘निसर्ग’ चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीमुळे दापोली, मंडणगड येथील घरांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. परिस्थिती लक्षात आल्यानंतर लोकांना आवश्यक ती मदत मिळाली पाहिजे, त्यासाठी आपणही प्रयत्न करायचे असा निश्‍चय करून मित्रांशी संवाद साधायला सुरवात केली. नक्की द्यायचे हे ठरत नव्हते. प्रत्यक्षात माहिती घेतल्यानंतर घरांचे नुकसान भरपूर आहे. कौले, पत्रे उडाली आहेत आणि त्याची त्यांना गरज अधिक आहे. कौलांची किंमत काढली तर एक कौल साधारण 19 रुपयांना मिळते. 4 हजार कौलांचे 76 हजार रुपये होतात. भंडारी युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष नीलेश नार्वेकर, सचिव अमित नागवेकर यांच्याशी विषय मांडला. मदतीसाठी आवाहनाचा एक मेसेज व्हॉटस् अ‍ॅप ग्रुपवर पाठवला. अर्धा तास झाला नाही तोच काळबादेवी येथील अमोल मयेकर यांचा फोन वाजला. त्यांनी 500 कौले देतो असे सांगितले. मग लगेचच पैसे जमवायला सुरवात केली. पाठोपाठ सहाशे जुनी कौले उत्तम स्थितीतील असल्याचे एकाने सांगितले. तेव्हा लगेचच अशी जुनी कौले शोधण्याचा प्रयत्न केला. सगळीकडे संपर्क करायला सुरवात केली. मदतीचा ओघ सुरू झाला. आपल्याला कौले मोफत मिळाली, ती पण सर्व भंडारी समाज बांधवांकडून.

ही कौले घेऊन जाण्यासाठी अभि विलणकर यांनी तयारी दर्शवली. प्रवासासाठी लागणारा थोडा खर्च महसूल विभागातील कर्मचार्‍यांनी उचलला आणि सुमारे बाराशे कौले घेऊन एक गाडी दापोलीतील लोकांसाठी रवाना झाली. यामध्ये नीलेश नार्वेकर, अमित नागवेकर, मिलिंद मयेकर, अभि विलणकर, अमोल मयेकर, राज चव्हाण, दीपक कीर (जुवे), दीप नागवेकर (सोमेश्वर), संतोष घोसाळे, पम्या घोसाळे, आशु घोसाळे, राजेश कळंबटे, माझे मित्र सुरेंद्र भोजे, अभि शेट्ये, अमोल रायबोले, गणेश खेडेकर, आत्माराम मुरकुटे, अमोल पडयार, अमित शिगवण (तलाठी) यांच्यासह भंडारी युवा प्रतिष्ठानने हातभार लावला. मदतीमध्ये खारीचा आपला वाटा असावा या हेतूने प्रेरित होऊन कीर यांनी हा प्रयत्न केला होता. पहिल्या टप्प्यातील कौले रवाना झाली असून उपलब्ध होतील तशी कौले, पत्रे पाठविण्याचा निश्‍चय कीर यांनी व्यक्त केला.