त्या बार्जवरील क्रू मेम्बर्सचा कोरोना अहवाल निगेटिव्ह; बार्ज रेस्क्यूसाठी आजपासून ऑपरेशन

रत्नागिरी:- भरकटत मिर्‍या समुद्रकिनारी लागलेल्या त्या इंधनवाहू जहाजावरील 13 क्रू मेम्बर्स चा (खलाशी) कोरोना अहवाल निगेटिव्ह आला आहे. त्यांना क्वारंटाईनमधून सोडण्यात आले. त्यानंतर पोलिस यंत्रणेकडून त्यांच्या कागदपत्रांची चौकशी करण्यात आली. त्यामुळे शनिवारपासून (ता. 13) जहाज काढण्याबाबत खर्‍या अर्थाने सुरवात होणार आहे. 

इंधन वाहतूक करणारे हे जहाज होते. साउथ आफ्रिकेहून ते शारजा-दुबईला जात होते. मात्र ‘निसर्ग’ चक्रीवादळाचा इशारा मिळाल्यामुळे त्यांनी रत्नागिरी बंदर विभागाकडे आश्रय मागितला. वादळाबरोबर जहाजावरील 13 क्रूजरच्या जीवितास धोका निर्माण झाल्याने नर्मदा जेटीला जहाज लावण्याची बंदर विभागाने परवानगी दिली. जहाज अँकर टाकून ठेवले होते. मात्र ‘निसर्ग’ चक्रीवादळाचा तडाखा बसला आणि अजस्त्र लाटांच्या तडाख्यात जहाजाचा अँकर तुटून ते भरकटत मिर्‍या समुद्रकिनार्‍याला लागले. जहाजावरील 13 क्रूजरना स्थानिकांच्या मदतीने सुखरूप बाहेर काढण्यात आले. परदेशी नागरिक असल्याने कोरोना संसर्गाच्या भीतीने त्यांना तत्काळ क्वारंटाईन करण्यात आले. त्यांचे सर्वांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले असले तरी तेरा दिवस आरोग्य यंत्रणा त्यांच्यावर लक्ष ठेवून होती. सर्व खलाशांची प्रकृती स्थिर असल्याने जिल्हा प्रशासन आणि आरोग्य विभागाच्या परवानगीने त्यांना आज क्वारंटाईन कक्षातून सोडण्यात आले. 

या सर्व प्रक्रियेमध्ये पोलिस चौकशी राहिली होती. पोलिसांनी आज सर्वांची चौकशी करून कागदपत्रांची शहानिशा केली. शनिवारपासून हे क्रूजर जहाजावर जाणार आहेत. त्यानंतर ते आपल्या एजन्सीशी संपर्क साधून जहाज काढण्याबाबत सुरवात करणार आहेत. बंदर विभागाने याला दुजोरा दिला. या दरम्यान जहाजामधून काही प्रमाणात जळक्या ऑईलची गळती होत आहे. तसेच लाटांच्या तडाख्यामुळे जहाज दगडी बंधार्‍यावर आदळून नुकसान झाले आहे. जहाज बांधून ठेवण्यात आलेला दोरखंडदेखील तुटला होता; मात्र नवा दोरखंड बांधून जहाज सुरक्षित ठेवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. या जहाजापासून काही धोका नसल्याचे यंत्रणांकडून सांगण्यात आले.