‘त्या’ टोळीकडून अनेकांना चुना; लवकरच कारनामे उघड

रत्नागिरी:- बांधकाम खात्यात सरकारी नोकरीला लावतो असे आमिष दाखवणार्‍या टोळीचे कारनामे आता हळूहळू उघडकीस येऊ लागले. प्राथमिक तपासात १५ ते २० जणांची ५० लाख रूपयांची फसवणूक झाली असल्याची माहिती पुढे आली असून या टोळीविरोधात आणखी गुन्हे दाखल होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. दरम्यान, यातील २ संशयित अद्यापही फरार आहेत.

पानवल येथील पूजारी शंकर लिंगायत यांच्याशी ओळख वाढवून तुमच्या मुलाला बांधकाम खात्यात सरकारी नोकरीला लावतो असे सांगून १ लाख १५ हजार रूपयांची रक्कम फसवणूक करून काढून घेतली होती तसेच बनावट सेवा पुस्तक तयारदेखील केले होते. दरवेळी थातूरमातूर उत्तरे लिंगायत यांना दिली जात होती. मात्र लाखो रूपये देऊनदेखील आपल्या मुलाला नोकरी मिळत नसल्याने लिंगायत यांनी ग्रामीण पोलीस स्थानक गाठले होते. त्यानंतर या टोळीचा पर्दापाश झाला होता.

याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून संशयित आरोपी साईराज विलणकर (२७), वैशाली दरडे उर्फ नेहा आखाडे (३८), दोन्ही रा.खडपेवठार, रत्नागिरी), साईराज मोरे (२६ , रा . शिरगाव, रत्नागिरी), अनोफ झारी (रा. कोकणनगर , रत्नागिरी), धिरज खलसे (२३, रत्नागिरी) आणि ओमकार तोडणकर (पेठकिल्ला,रत्नागिरी) यांना अटक केली होती. अटकेतील सर्व संशयित सध्या पोलीस कोठडीत आहेत तर पूजा विलणकर (रा. खडपेवठार, रत्नागिरी) आणि आशिष पाथरे (रा. साडवली,देवरुख) ही दोघे अद्याप फरार असून पोलीस त्यांच्या मागावर आहेत.

दरम्यान, याप्रकरणात आता अनेक धक्कादायक बाबी पुढे येऊ लागल्या आहेत. या टोळीने आतापर्यंत अनेकांना गंडा घातल्याचे पोलीस तपासात पुढे आले. प्राथमिक तपासात १५ ते २०जणांची फसवणूक झाल्याची माहिती पुढे आली असून  तब्बल ५० लाखांच्या आसपास ही फसवणूक असल्याची माहिती पुढे आली आहे.

यातील संशयित आरोपी साईप्रसाद विलणकर हा त्यातील मास्टरमाईंड असून इतर सहकारी हे कस्टमर शोधण्यासाठी त्याला मदत करत होते. तसेच नवे कस्टमर शोधून त्यांना नोकरीचे आमिष त्या सर्वांकडून दाखवले जात होते. तसेच या टोळीतील महिला फोन करून नोकरीबाबत त्या कस्टमरना माहितीदेखील देत होत्या, अशी माहिती तपासात पुढे आली आहे.
या टोळीचा पर्दापाश झाल्यानंतर फसवणूक झालेल्यांपैकी काहींनी थेट ग्रामीण पोलीस स्टेशन गाठले होते. अनेकांनी आपली कैफियत पोलीस स्थानकात मांडली होती. काहींना शहर पेालीस स्थानकात तक्रार देण्याच्या सूचना ग्रामीण पोलीस निरीक्षक सुरेश कदम यांनी दिल्या त्यामुळे याप्रकरणात आणखी नवीन गुन्हे दाखल होण्याची शक्यता आहे.

दरम्यान,याबाबत ग्रामीण पोलीस निरीक्षक सुरेश कदम यांनी जिल्ह्यात अशी कोणाची फसवणूक झाली असेल तर त्यांनी ग्रामीण पोलीस स्थानकाशी संपर्क साधावा तसेच तक्रार देण्यासाठी पुढे यावे, असे आवाहन केले आहे.