जिल्हा परिषदमध्ये पदाधिकाऱ्यांचा पुन्हा अधिकाऱ्यांशी संघर्ष

रत्नागिरी:- जिल्हा परिषदेचा कारभार चालवताना विभागप्रमुख मनमानी करत असल्याचा ठपका ठेवत सदस्यांनी सर्वसाधारण सभेत जोरदार आसुड ओढले. मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांशी चर्चा करुन त्या अधिकार्‍यांवर कारवाई करण्याचे आश्‍वासन देत अध्यक्ष रोहन बने यांनी सदस्यांनी तोंड फोडलेला प्रश्न मार्गी लावला.

अध्यक्ष रोहन बने यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वसाधारण सभा शामराव पेजे सभागृहात झाली. सोशल डिस्टंन्सिंगसह कोरोनाशी निगडीत नियमांचे काटेकोरपणे पालन यावेळी करण्यात आले होते. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे दापोली, मंडणगड दौर्‍यावर असल्यामुळे मुख्य कार्यकारी अधिकारी कान्हुराज बघाटे यांच्यासह राज्य शासनाच्या विविध खात्याचे प्रमुख अनुपस्थित होते. कृषी, पाणीपुरवठा, जलयुक्तशिवार यासह जनसुविधांतर्गत विषयांवर चर्चा झाल्यानंतर सदस्यांनी आस्थापनेतील कामकाज योग्य पध्दतीने चालत नसल्याचे पुढे आहे. सामान्य प्रशासनच्या अधिकार्‍यांकडून योग्य कामकाज होत नाही, असा सुर संतोष थेराडे, विनोद झगडे, परशुराम कदम, सौ. स्वरुपा साळवी, देवयानी झापडेकर यांनी सभागृहात आळवला. त्याला आरोग्य सभापती बाबू म्हाप यांनीही पाठबळ दिले. सभापती असताना परिचर बदल्यांविषयीची माहिती देण्यासाठी पाच महिन्यांचा कालावधी लावला गेला असा विषय झगडे यांनी मांडला. या चुकीची कबुली दिल्यानंतर सदस्यांनी अन्य विषयांमध्ये चुकारपणा होत असल्याचे परखडपणे मांडले. सामान्य प्रशासनचे अधिकारी अर्चना वाघमळे यांनी उत्तरे देण्याचा प्रयत्न केला होता. डवरी क्लार्क यांच्यासंदर्भात न्यायालयाचा निर्णय होऊनही तीन महिने त्यावर कार्यवाही झालेली नाही. दापोलीतील नलावडे लिपिकांवरील कारवाई, चांदेराई आरोग्य केंद्रातील कर्मचार्‍यांना बजावलेली नोटीस यावरुन अधिकार्‍यांची कोंडी करण्यात आली. त्याला उत्तरे देताना अधिकारीही गडबडले. सदस्यांच्या मागण्याची पुर्तता होत नसेल तर आम्ही सभागृहात का यायचे असा प्रश्‍न करत नाईलाजास्तव आम्हाला सभागृह सोडावे लागेल असे मत श्री. थेराडे यांनी व्यक्त केले. अधिकार्‍यांबद्दल होत असलेल्या या तक्रारींची गंभीर दखल घेत अध्यक्ष रोहन बने यांनी संबंधित अधिकार्‍यांवर कारवाई केली जाईल, असे बजावले. तसेच खातेप्रमुखांनी परिपूर्ण महिती असल्याशिवाय सभागृहात उपस्थित राहू नये अशी तंबीही दिली. याप्रसंगी कोरोनामुळे केलेली टाळेबंदी, निसर्ग चक्रीवादाळात झालेले नुकसान याची चर्चा आजच्या सर्वसाधारण सभेत होणे अपेक्षित होते; परंतु दुर्देवाने तसे झाले नाही. आस्थापनातील त्रुटींबाबत चर्चा सुरु राहील. अशाप्रकारे कामकाज करण्याएवढी वेळ आली असेल तर त्यांची गांभिर्याने दखल घेतली पाहीजे, असा ज्येष्ठत्त्वाचा सल्ला देत उदय बनेंनी कान टोचले.

जिल्ह्यातील खतांच्या तुटवड्याचा विषय जिल्हा परिषद सर्वसाधारण सभेतही जोरदार चर्चा झाली. शेतकर्‍यांच्या मागणीनुसार खत पुरवठा होत असल्याचा दावा कृषी विभागाकडून केला गेला. यावर सदस्य संतोष थेराडे यांनी गावात खत मिळत नसल्याचे त्यांनी पुढे केले. तर उदय बने यांनी बांधावर खते, बियाणे देण्यात कृषी विभाग अपयशी ठरल्याचे सांगितले. तसेच आलेले खत विक्रेत्यांनी मोठ्या बागायदारांना विकले असून सामान्य शेतकर्‍यांना वंचितव ठेवल्याचा आरोप केला आहे. बाजारात शेतकर्‍यांना खत मिळत नसेल तर ते गेले कुठे असा प्रश्‍नही उपस्थित केला गेला. यावर कृषी विभागाचे अधिकारी निरुत्तर झाले होते. अलिबाग, तुर्भे येथून कोकण रेल्वे मार्गे खत रत्नागिरी, सिंधुदुर्गमध्ये आणले जात आहे. गाडी रत्नागिरीत आली आहे. मात्र ते उतरविण्यासाठी कामगारच उपलब्ध नाहीत, असे कृषी विभागाकडून सांगण्यात आले. कोरोनाच्या भितीने शेकडो कामगार परराज्यात गावी रवाना झाले आहे. स्थानिकपातळीवर अवघे चाळीस कामगार मिळाले आहेत. एक गाडी रिकामी करण्यासाठी सुमारे दीडशे ते दोनशे कामगारांची गरज भासते.