रत्नागिरी:- राज्यसरकारने कोकणवासियांना सर्वात मोठा दिलासा दिला असून मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत मदतीच्या निकषात सर्वात मोठे बदल केले असून पूर्णतः नुकसान झालेल्या घरांना आता दीड लाखांची मदत शासनाने जाहीर केली असल्याची माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली.
निसर्ग चक्रीवादळानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रायगड जिल्ह्याचा तर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी रत्नागिरी जिल्ह्याचा दौरा केला होता.या वादळात कोकणात मोठी पडझड झाली होती.त्यामुळे अनेक शेतकरी, बागायतदार सर्वच या वादळामुळे उध्वस्त झाले आहेत.अनेकांची घरे कोसळली असून हे नुकसान म्हणजे दोन तालुके २५ वर्ष मागे आले असल्याचे चित्र सध्या पहायला मिळत आहे. शासन निकषामुळे तुटपुंजी मदत या बाधितांना आजवर मिळत होती.मात्र त्यातून झालेले नुकसान भरून येत नव्हते.त्यामुळे या निकषात बदल करावेत अशी मागणी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केली होती.
या पार्श्वभूमीवर गुरुवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक पार पडली.या बैठकीला राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार,नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत,खा.सुनील तटकरे,ना.आदिती तटकरे मुख्य सचिव अजोय मेहता आदी उपस्थित होते.
अंशतः ज्यांची घरे पडली आहेत त्यांना पूर्वी ६ हजार मदत दिली जात होती. तर अन्नधान्यासाठी १८०० रुपये व कपडे २००० असे मिळून ९८०० रुपयांची मदत दिली जात होती. यात बदल करून अंशतः घरांच्या नुकसानीसाठी ६ हजार ऐवजी आता १५ हजार रुपये तर धान्य व कपडे यासाठी १५ हजार असे मिळून हि मदत २५ हजार दिली जाणार आहे. तर पूर्णतः नुकसान झालंय त्यांना पूर्वी ९५ हजार रुपयांची मदत दिली जात होती.आता त्यातही बदल करून पूर्णतः नुकसान झालेल्यांना दीड लाख रुपयांची मदत देण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला.
बागायती व शेती साठी पूर्वी हेक्टरी १८ हजार रुपयांची मदत होत होती आता हि मदत वाढवून हेक्टरी ५० हजार रुपये दिले जाणार असल्याची माहिती ना.उदय सामंत यांनी दिली आहे.त्याचबरोबर बाधित क्षेत्रात ५ लिटर रॉकेल मोफत दिले जाणार असून ५ किलो तांदूळ व डाळ याचा देखील पुरवठा केला जाणार आहे.
ज्या बागा उध्वस्त झाल्या आहेत त्या पुन्हा उभ्या कराव्या लागतील. यासाठी पूर्वी जी रोजगार हमी योजनेतून फलोत्पादन अशी योजना होती ती पुनःजीवित करून उध्वस्त झालेल्या बागा पुन्हा उभ्या केल्या जाणार आहेत. हे निकष केवळ रायगड,रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी लागू असणार असल्याचे ना.उदय सामंत यांनी सांगितले.
या पार्श्वभूमीवर शासन प्रतिनिधी म्हणून आपण स्वतः २ दिवस दापोलीत ठाण मांडणार असल्याचे ते यावेळी म्हणाले.रत्नागिरी तालुक्यात जे नुकसान व पडझड झाली आहे त्याची पाहणी आपण भर वादळात केली आहे.दापोली मंडणगड या दोन तालुक्यात नव्या निकषांप्रमाणे मदत दिली जाणार आहे तेच निकष रत्नागिरीतहि लागू रहाणार असल्याचे ना.उदय सामंत यांनी सांगितले.