वर्षानुवर्षे वास्तव्य; जैवविविधतांमधील एक भाग
रत्नागिरी:- रत्नागिरी शहराच्या दक्षिण हद्दीवर भाट्याची खाडी. कर्ला ग्रामपंचायत हद्दीमध्ये कर्ला-जूवे खार बांधारा खाजण लाभ क्षेत्रात काही अंतरावर उद मांजरांचा कळपांचे गेली अनेक वर्षे वास्तव्य आहेत. खाडीच्या पाण्यातून पोहत-पोहत कळपाने डुबक्या मारत येणारी उद मांजरं मन मोहून टाकणारी आहेत. भाट्ये खाडीपासून पुढे जुवे गावापर्यंत विविध जैवविविधतांचे दर्शन घडविणारा किनारा आहे. त्यात ही उद मांजरं नेहमीच भर घालतात. त्यांचे संवर्धन करणे काळाची गरज आहे.
भाट्ये खाडीकिनार्यापासून सुरवात केली की पुढे खाडीनिकार्यावर वैशिष्ठ्यपूर्ण अशा गोष्टींचा अनुभव येतो. त्यामध्ये एक उदमांजराचा रहिवास हा एक आहे. कर्ला, जुवे, भाट्ये किनार्यावर राहणार्या अनेक नागरिकांना ही उदमांजरं सातत्याने आढळून येतात. किनार्यावर असलेल्या नारळ-पोफळीच्या बागांपर्यंत यांची फेरी असते. खारलॅण्ड बंधार्याच्या मागील मोकळ्या भागात त्यांचा सर्वाधिक वावर असतो. या ठिकाणी मासेमारी करणार्या अनेक मच्छीमारांसाठी ही उदमांजरं नेहमीचीच झालेली आहेत. याला अनेक लोक पाणमांजरही म्हणतात. भारतात हिमालयापासून कन्याकुमारीपर्यंत सगळीकडेच या प्राण्याचे वास्तव्य आढळून येते. त्याचे केस मऊ व तुळतुळीत असतात. रंग काळसर, तांबूस तपकिरी किंवा पिंगट तपकिरी असा असतो. ऊद मांजर हा सपाट प्रदेशात राहणारा असतो. सरोवरे, तलाव, नद्या, कालवे इत्यादींच्या काठावर तो राहतो. त्याचे मुख्य भक्ष्य मासे आहे; परंतु ते मिळाले नाही तर सहज पकडून खाता येतील असे कोणतेही प्राणी त्याला चालतात. खाड्या, नदीमुखे वगैरे ठिकाणी भक्ष्य शोधण्यासाठी ते कळपाने राहतात. रत्नागिरीतील भाट्ये, जुवे, कर्ला किनारी दिसत असलेल्या या उदमांजरांचा सहभाग निश्चित उपयुक्त आहे.