विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस उद्या जिल्हा दौऱ्यावर; 2 कोटीच्या मदत सामग्रीचे वाटप

रत्नागिरी:- माजी मुख्यमंत्री व विधानसभेचे विरोधी पक्षनेते उद्या (ता. 12) निसर्ग चक्रीवादळाचा फटका बसलेल्या दापोली, मंडणगड तालुक्यातील सहा गावांना भेट देणार आहेत. त्यांच्यासोबत भाजपचे कोकणातील आमदारही आहेत. या दौर्‍यात ग्रामस्थांना भाजपच्या वतीने या सुमारे दोन कोटी रुपयांची अन्नधान्य, साधनसामग्री वितरित केली जाणार असल्याची माहिती भाजप प्रदेश उपाध्यक्ष आमदार प्रसाद लाड यांनी पत्रकार परिषदेत दिली.

शासकीय विश्रामगृहात झालेल्या परिषदेत ते म्हणाले, महाडपासून श्री. फडणवीस यांचा दौरा सुरू झाला आहे. उद्या सकाळी 10 वाजता ते वेळास व अन्य दोन गावांना भेट देतील. तिथून ते आंजर्ले, पाजपंढरी व आणखी काही गावांना भेट देऊन नुकनानग्रस्तांचे दुःख जाणून घेतली. सायंकाळी दापोली येथील नगरपंचायत हॉलमध्ये जिल्हाधिकारी, प्रांताधिकार्‍यांकडून आढावा मदत व एकंदरीत स्थितीचा घेतील.

फडणवीस यांच्यासोबत विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, आमदार रवींद्र चव्हाण, आमदार निरंजन डावखरे, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बाल्दी, आमदार प्रसाद लाड व भाजपचे जिल्हाध्यक्ष डॉ. विनय नातू, अ‍ॅड. दीपक पटवर्धन सहभागी होणार आहेत.

हेक्टरी नव्हे झाडानुसार मदत द्या

निसर्ग चक्रीवादळग्रस्तांना हेक्टरी मदत नको तर कोकण कृषी विद्यापीठाने ठरवून दिलेल्या निकषांप्रमाणे प्रतीझाड मिळावी. शासनाने दिलेली मदत तुटपुंजी असून उद्ध्वस्त झालेल्या बागा साफ करण्यासाठीच 75 कोटींची मदत संपून जाईल. मच्छीमारांचेही मोठे नुकसान झाले आहे. त्यांना डिझेल परतावा, जाळीसाठी घेतलेले व व्यवसायासाठी घेतलेल्या कर्जातून दिलासा मिळाला पाहिजे, अशी मागणी आमदार लाड यांनी केली.

महाविकास आघाडी सरकार फेल- आमदार प्रसाद लाड

कोरोना परिस्थिती हाताळण्यात आणि कोकणात आलेल्या निसर्ग चक्रीवादळानंतरची उद्ध्वस्त स्थिती हाताळणी करताना राज्यातील महाविकास आघाडी सरकार ‘फेल’ गेले आहे, अशी टीका भाजपचे आमदार प्रसाद लाड यांनी केली. विरोधी पक्ष फक्त आरोप करत असल्याच्या राष्ट्रवादी व काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांच्या टिकेवर बोलताना ‘आम्हाला रोग्याशी नाही, रोगाशी लढायचे आहे’ आणि ‘गेट विल सून’ असे सूचक विधानही त्यांनी केले.

माजी कृषीमंत्री शरद पवार यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केलेल्या टिकेबाबत लाड म्हणाले, ते उगाच टिका करत आहेत. राज्यातील सर्वात मोठा पक्ष भाजप असल्याने व सरकारचे काम फारसे सुरळित नसल्यानेच त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. वादळानंतर आघाडीतील तिन्ही पक्षांचे नेते वेगवेगळे दौरे करून प्रशासनाला आपापल्या पद्धतीने सूचना देत आहेत. हे सरकार झोपी गेले आहे. त्यांना जागे करण्याकरिताच माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वादळग्रस्त तालुक्यांना भेट देणार आहेत, असे आमदार लाड यांनी स्पष्ट केले.

भाजपकडून मदत

भाजप, रा. स्व. संघाच्या वतीने तातडीने मदत सुरू केली. भाजप आमदारांनी प्रत्येकी 2 लाख रुपये, नगरसेवक 50 हजार, खासदार 3 लाख रुपये, जिल्हाध्यक्ष 50 हजार रुपये, मंडल प्रभारी 11 हजार रुपये या रितीने एक कोटी रुपये गोळा केले आहेत. अजून त्यात दीड कोटी रुपये वाढतील. त्या माध्यमातून भाजपने 14 मोठे ट्रक भरून साधनसामग्री दिली आहे. यात धान्य, ताडपत्री, सोलर दिवे असे जीवनावश्यक साहित्य आहे. रस्ते, घरांवर पडलेली झाडे तोडण्यासाठी पेट्रोलवर चालणारी 50 वूडकटर देणार असल्याचे त्यांनी सांगितले.