रत्नागिरी:- स्ट्रक्चरल ऑडिटमध्ये धोकादायक ठरलेल्या रत्नागिरी नगर परिषदेच्या प्रशासकीय इमारतीकरिता अखेर शासनाने ५ कोटी रूपयांचा निधी मंजूर केला आहे. उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांच्या प्रयत्नाने वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत हा निधी मंजूर झाला आहे.
रत्नागिरी नगर परिषदेच्या इमारतीला सुमारे ४८ वर्षे पूर्ण झाली आहेत. दि. १६ मे १९७१ रोजी तत्कालीन आमदार शामराव पेजे यांच्या हस्ते या इमारतीचे उद्घाटन झाले होते. जुनी असलेल्या इमारतीचे बांधकाम जीर्ण झाले आहे. इमारतीच्या सर्वात वरील मजल्यावर नगराध्यक्षांचे दालन आहे. या दालनावरील छप्पर लिकेज असल्याने पावसाळ्यात नगराध्यक्षांच्या दालनालाच गळती लागते. त्यामुळे या छताची तात्पुरती दुरूस्ती केली आहे.तसेच इमारतीच्या मध्यभागी असलेल्या जिन्यासमोरील दुसर्या मजल्यावर पावसाळ्यत छतामधून पाणी गळते. त्यामुळे सभागृहासमोरील भागाची दुरवस्था होत आहे.
तळमजल्यावर मुख्य दरवाजासमोरच नियोजन समिती सभापती, महिला व बालकल्याण समिती सभापती, उपसभापती, शिक्षण समिती सभापती यांची दालने आहेत. मात्र या दालनाच्या छताच्या पीओपीचा भाग दोन वर्षांपूर्वी ढासळला होता. त्यामुळे सभापतींच्या केबीनही त्या भागातून काढण्यात आल्या. दुसर्या मजल्यावरील गॅलरीतील बांधकामही ठिकठिकाणी निखळले आहे. अनेक ठिकाणी स्लॅबलाही भेगा गेल्या आहेत. काही ठिकाणी स्लॅबच्या केवळ लोखंडी सळ्या लटकत आहेत.
इमारतीचे तीन वर्षांपूर्वी स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात आले होते. पुणे येथील केबीपी सिव्हील इंजिनिअरिंग सर्व्हिसेस यांनी सादर केलेल्या ऑडिटच्या अहवालात नगर परिषदेची इमारती वापरास अयोग्य असून त्याची दुरूस्तीही अशक्य असल्याचे नमूद करण्यात आले होते. त्यामुळे न.प.च्या जुनी इमारतीचे निर्लेखन करून नवीन इमारतीचा प्रस्ताव तयार करण्यात आला होता. त्यानुसार नव्या इमारतीसाठी वेगाने कार्यवाहीदेखील सुरू झाली होती.
सहा मजली अद्ययावत इमारत उभारण्याचा आराखडा तयार करण्यात आला आहे. सर्वात वरच्या मजल्यावर नागरिकांसाठी रत्नागिरी दर्शनासाठी स्पेशल गॅलरीही तयार केली जाणार आहे. तर नगराध्यक्ष दालनासह सभागृह, सभापती दालने, विविध विभागांसाठी स्वतंत्र खोल्या, मुख्याधिकारी दालन, विषय समित्यांच्या बैठकांसाठी दालने, विश्रांतीगृह, स्वागत कक्ष, स्थायी समिती बैठक सभागृह आदीचा समावेश आहे.
नगर परिषदेकडे ३० कोटी रूपयांचा आराखडा असून राज्य सरकारने नवे डिझाईन तयार करण्याचा निर्णय घेतल्यामुळे पालिकेच्या डिझाईनमध्ये बदल केला जाणार होता. यामुळे इमारतीची तांत्रिक मंजूरी रखडली होती. आता तर नगरविकास खात्याने वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून रत्नागिरी नगर परिषदेच्या प्रशासकीय इमारतीसाठी ५ कोटी रूपयांचा निधी मंजूर केला आहे. त्याबाबतचा अध्यादेश अवर सचिव विवेक कुंभार यांनी १० जून २०२० रोजी काढला असून आता नव्या इमारतीचा मार्ग मोकळा झाला आहे.
नगर परिषदेची इमारत व्हावी यासाठी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सातत्याने त्याचा पाठपुरावा केला होता. मंत्रालयात वेळोवेळी त्यासंदर्भात बैठकादेखील झाल्या होत्या. मात्र मार्च महिन्यात आलेल्या कोरोनामुळे हा प्रश्न जैसे थे राहिला होता. अखेर त्यावरदेखील निर्णय होऊन न. प. च्या प्रशासकीय इमारतीकरिता शासनाने ५ कोटी रूपये मंजूर केले आहेत.