पुढील दोन दिवस मुसळधार पावसाचा इशारा

रत्नागिरी:- कोकणात एक दिवस उशिराने मॉन्सुन दाखल झाला असून रत्नागिरीत गुरुवारपासून (ता. 11) संततधार पावसाला सुरवात झाली आहे. निसर्ग चक्रीवादळामुळे जुनच्या पहिल्या आठवड्यात जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाला, त्यानंतर पुन्हा पावसाने विश्रांती घेतली होती. मात्र पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. 

गुरुवारी सकाळी 8.30 वाजेपर्यंतच्या चोविस तासात जिल्ह्यात सरासरी 18.89 मिमी पावसाची नोंद झाली. त्यात मंडणगड 25, दापोली 23, खेड 21, गुहागर 22, चिपळूण 18 संगमेश्‍वर 24, रत्नागिरी 8, राजापूर 15, लांजा 14 मिमी पाऊस झाला. 1 जूनपासून आतापर्यंत 170 मिलीमीटर पावसाची नोंद झालेली आहे. हवामान विभागाकडून वर्तविलेल्या अंदाजानुसार 8 ते 9 जुनपर्यंत केरळहून मॉन्सून कोकणात दाखल होईल अशी शक्यता होती; परंतु अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे 2 जुनला निसर्ग चक्रीवादळ झाले. त्यानंतर दोन दिवसांनी पुन्हा कमी दाबाचा पट्टा तयार झाला. त्यावेळी निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे कोकणात मॉन्सुन दाखल झाला. गतवर्षी मॉन्सून दाखल होण्यासाठी उशिर झाला होता.

यावर्षी एक दिवस उशिरा झाला असला तरीही बळीराजाची कामे वेगाने सुरु झालेली आहेत. रोहीणी नक्षत्राच्या मुहूर्तावर संगमेश्‍वर, राजापूरसह काही तालुक्यातील शेतकर्‍यांनी धुळवाफ पेरणी केली होती. त्यांच्यासाठी 2 जुनला पडलेला मॉन्सुनपुर्व पाऊस लाभदायक ठरला. त्यानंतर पावसाने विश्रांती घेतली असली तरीही अधूनमधुन एखादी सर पडतच होती. जिल्ह्यातील पन्नास टक्केहून अधिक शेतकर्‍यांनी पेरणीची कामे पूर्ण केली आहेत. गुरुवारी दुपारपर्यंत कडकडीत ऊन पडलेले होते. दुपारी अचानक वारे वाहू लागले आणि ढगांचा गडगडाट करत पावसाला सुरुवात झाली. मॉन्सुन दाखल झाल्यामुळे शेतीच्या कामांना वेग येणार आहे.