रत्नागिरी:-कोरोनामुळे यंदाचे शैक्षणिक सत्र लांबण्याची शक्यता असला तरीही जिल्हा परिषद शाळा सज्ज झाल्या आहेत. प्राथमिक शाळांमधील मुलांना मोफत पुस्तके वाटप करण्यात येतात. त्यासाठी जिल्ह्यात 6 लाख 71 हजार 495 पुस्तकांचे सेट दाखल झाले आहेत. त्यासाठी 2 कोटी 81 लाख 47 हजार 926 रुपयांचा निधी लागला. कोल्हापूर येथील एजन्सीकडून पुस्तके प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी पुरवण्यात आली आहेत. शाळा सुरू झाल्यानंतर पहिल्या दिवशी वाटप करता येणार आहेत.
कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यामुळे गतवर्षी शैक्षणिक सत्रातील परिक्षांचा कालावधी पूर्ण झाला नाही. एक मार्चअखेर आणि एप्रिल असा सव्वा महिना शाळांना सुट्टी दिली गेली. अजूनही देशभरात कोरोनाचे थैमान सुरुच आहे. यामध्ये वयोवृद्ध आणि लहान मुले यांना कोरोनाचा सर्वाधिक धोका असल्याचे आरोग्य विभागाकडून स्पष्ट केले आहे. त्यामुळे शाळांचे 2020-21 चे शैक्षणिक सत्र कधी सुरू होणार यावर निर्णय प्रलंबित ठेवण्यात आला आहे. तरीही शाळा सुरू करण्यासाठी आवश्यक तयारी करण्याच्या सूचना शिक्षण विभागाकडून दिल्या आहेत. त्यानुसार जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाने पुस्तके आणि शाळेचा युनिफॉर्मसाठी आवश्यक ती मागणी शासनाकडे केली होती. त्यानुसार कोल्हापूर येथील एजन्सीकडून पुस्तके प्राप्त झाली आहे. त्या-त्या तालुक्यातील विषयतज्ज्ञ आणि शिक्षक यांनी कोल्हापूर येथूून पुस्तके आणण्याचे काम केले आहे. जिल्ह्यासाठी पावणेसात लाख विविध विषयांची पुस्तके लागणार होती. त्यानुसार 90 टक्के पुस्तके आणली गेली आहे. शासनाच्या निकषानुसार दरवर्षी शाळेच्या पहिल्या दिवशी पुस्तके आणि युनिफॉर्म जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांतील विद्यार्थ्यांना दिला जातो. यंदा तशी व्यवस्था करुन ठेवण्यात आली आहे. कोरोनामुळे पुस्तके वेळेत मिळतील की नाही याबाबत सांशकता होती; मात्र त्यावर मात करण्यात यश आले आहे.