जि. प. च्या 50 टक्क्यांपेक्षा अधिक शाळां नॉट रिचेबल

ऑनलाईन अभ्यासक्रमाबाबत प्रश्नचिन्ह

रत्नागिरी:-यंदाच्या शैक्षणिक सत्रावर कोरोनाचे सावट असल्यामुळे बहूतांश शैक्षणिक संस्थांसह शासनाच्या शाळांमध्ये ऑनलाईन शिक्षणाचा फंडा वापरला जाण्याची शक्यता आहे; मात्र ग्रामीण भागात हा फंडा यशस्वी होणे अशक्य आहे. नेट कनेक्टीव्हीटीबरोबरच जिल्हा परिषद शाळांमधील इंटरनेट सुविधांचा अभाव अडचणीचा ठरणार असल्याची शक्यता आहे. रत्नागिरीत जिल्हा परिषदेच्या 2600 शाळांपैकी 916 शाळा कोरोनाचे निकष पाळून सुरु करता येऊ शकतात, असा अंदाज शिक्षण विभागाकडून घेतलेल्या माहितीतून व्यक्त केला जात आहे.

शैक्षणिक वर्षाच्या अंतिम टप्प्यातच म्हणजे मार्च महिन्यात सर्व शाळा व माध्यमिक विद्यालये बंद झाली आहेत. वार्षिक परीक्षा न झाल्याने मागील चाचणी परीक्षांचा आधार घेत विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर करण्यात आला. नव्या शैक्षणिक वर्षाची सुरूवात 15 जूनपासून होणार होती. मात्र कोरोनाच्या रूग्णांमध्ये वाढ होत निघाल्याने हे शैक्षणिक वर्ष कधी सुरू होणार याबाबत अजूनही संभ्रमावस्था आहे. शिक्षण विभागाकडून कोणत्याही मार्गदर्शक सूचना किंवा शाळा सुरू करण्याच्या नियोजनावर लेखी आदेश आलेले नाहीत. शाळा सुरु करण्यासाठी शिक्षण आयुक्तांनी जिल्हानिहाय आढावा घेतानाच थेट केंद्रप्रमुखांशी चर्चा केली होती. सोशल डिस्टंन्सिंगसह कोरोनाशी निगडीत निकष व नियमांचे पालन करत शाळा सुरु करण्याबाबत केंद्रप्रमुख, शिक्षक आणि पालकांशी चर्चा करण्यात आली होती. त्यानंतर जिल्ह्यातील 916 शाळांमध्ये सोशल डिस्टंन्सींग पाळून त्या सुरू करता येऊ शकतात असे दिसून आले. कमी पटसंख्या असलेल्या शाळांमध्ये थेट शिक्षण सुरू करता येऊ शकते. याबाबत जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाकडून शासनाला तसे कळवल्याची माहिती प्राप्त झाली आहे; मात्र अजुनही गावागावांमध्ये कोरोनाचे भय असल्यामुळे बहूतांश पालक मुलांना शाळेेत पाठविण्यास तयार नाहीत.

निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे; मात्र ऑनलाईन शिक्षणाला भौगोलिकदृष्ट्या अडचणीच्या गावांमध्ये मर्यादा पडू शकतात. ग्रामीण भागात मोबाईलला व्यवस्थित रेंज मिळत नाही, तर तिथे नेट उपलब्ध होणे अशक्यच आहे. या परिस्थितीत ऑनलाईन शिक्षणात अडचणी आहेत. जिल्हा परिषदेच्या 2574 प्राथमिक शाळा आहेत. यातील 90 टक्के शाळा ग्रामीण भागात आहेत. जेथे नेटचा प्रश्‍न आहे. जवळपास 500 शाळांमध्येच बर्‍यापैकी नेट आहे. या शाळांमध्ये ऑनलाईन शिक्षण सुरू करता येऊ शकते.