जिल्ह्यातील 23 गावांमध्ये सुरू होणार विशेष प्रकल्प

रत्नागिरी:- आताच येऊन गेलेल्या निसर्ग चक्रीवादळाचा वेग ज्या ठिकाणी कांदळवने आहेत, त्याठिकाणी मंदावला होता. त्यामुळे किनारपट्टीला आतील बाजूस असलेल्या गावांना चक्रीवादळाचा कमी फटका बसला. कारण कांदळवने ही चक्रीवादळ आणि सुनामी यासारख्या नैसर्गिक संकटांमध्ये ‘जैविक भिंत’ म्हणून काम करतात. त्यामुळे जिल्ह्याच्या किनार्‍यावर असलेल्या कांदळवनांचे संरक्षण करण्यासाठी वनविभागाच्या कांदळवन कक्षातर्फे रत्नागिरी जिल्ह्यातील 23 गावांमध्ये कालवेपालन, खेकडेपालन, शोभिवंत मत्स्यपालन यासह जिताडा मत्स्यपालनाचे प्रकल्प सुरु करण्यात येणार आहेत. या माध्यमातून त्या-त्या गावातील तरुणांना रोजगार संधीही दिल्या जाणार आहेत.

पर्यावरणाच्या दृष्टीने अतिशय महत्वपूर्ण असणा-या कांदळवनांच्या लोकसहभागातून संरक्षण करण्यासाठी वनविभागाच्या कांदळवन कक्ष व कांदळवन प्रतिष्ठान मुंबई यांच्या अधिनस्थ राज्यातील सर्व समुद्रकिनारी जिल्हयात कांदळवन संरक्षण व उपजिवीका निर्माण योजना राबविण्यात येत आहे. या योजनेतून खाजगी, शासकीय नियोजनबद्ध संरक्षण व संवर्धन करणे, अवलंबुन जनता यांच्यातील सहकार्य वृद्धींगत करणे, अशी उद्धिष्ठे निश्‍चित केली आहेत. त्यासाठी रत्नागिरी जिल्हयात कांदळवन सह व्यवस्थापन समितीमार्फत विविध रत्नागिरी जिल्हयात कांदळवन सहव्यवस्थापन समितीमार्फत विविध प्रकल्प शासन निर्णयानुसार सुरू करण्यात आली आहे. त्यात कालवेपालन हा प्रकल्प गावखडी, धाउलवल्ली, बुरंबेवाडी, जुवे-जैतापूर, जानशी, अणसुरे येथे सुरु करण्यात आला आहे. शोभिवंत मत्स्यपालन हे आडे, मयेकरवाडी, धाउलवल्ली येथे सुरु असून जिताडा मत्स्यपालनासाठी सागवे, गावखडी, मालगुंड व राई या गावे प्रस्तावित आहेत. खेकडापालन प्रकल्प शिरसे, जानशी, पावस, वरवडे, मालगुंड, राई, गडनरळ, मुर्डी या गावात होणार आहे. निसर्ग पर्यटनातून रोजगार उपलब्धीसाठी सोनगाव व आंजर्ले येथे प्रयत्न करण्यात येत आहेत.

महाराष्ट्राचा 720 किलोमीटर सागरी किनारा खारफुटी वनस्पती, संगती वनस्पती व इतर जैवविधितेने नटलेला आहे. खारफुटीच्या जवळपास 20 प्रजाती वनस्पती येथे पाहावयास मिळतात. रत्नागिरी जिल्ह्यात 2,432 हेक्टर शासकीय कांदळवन क्षेत्र आहे. समुद्रातील मासे अन्न, निवारा आणि प्रजननांसाठी कांदळवनात येतात, त्यामुळे मत्स्यव्यवसायाच्या दृष्टीने कांदळवने फार महत्वाची आहेत. त्यातून सागरी लोकवस्तीला उपजिवीका प्रदान होते. याशिवाय वातावरणातील उर्जा मोठयाप्रमाणावर शोषून घेणे, जागतिक तापमान वाढ नियंत्रित करण्यास मदत करणे, समुद्र किना-याची धूप थांबविणे, घातक रसायने शोषून खाडी क्षेत्रास संरक्षण देणे, सुंदर असे निसर्ग पर्यटन, विवि मासे, पक्षी, किटक व सरपटणारे प्राणी यांना संरक्षण देणे यासारखे कांदळवनांचे अतिशय महत्वाचे फायदे आहेत. हे जरी असले तरी कांदळवनांना नैसर्गिक वादळ, वावटळी, वनवे, सुक्ष्मजीव असे धोके आहेत आणि मानवनिर्मित औदयोगिकीकरण, वाळू उपसा, अवैध उत्खनन, वारेमाप पर्यटन, प्रदुषण, घनकचरा अशाप्रकारचे धोके आहेत.