ग्रामीण जनतेला दिलासा; उद्यापासून एसटी सेवा सुरू

रत्नागिरी:- लॉकडाऊनपासून बंद असलेली एसटी सेवा शुक्रवार पासून टप्प्याटप्प्याने सुरू होणार आहे. पहिल्या टप्प्यात ग्रामीण भागातील एसटी बसेस सुरू करण्यात येणार आहेत. नियम आणि सोशल डिस्टनसिंग पाळून ग्रामीण एसटी सेवा सुरू करण्यात येणार आहे.
 

जिल्हा अंतर्गत एसटी सेवा सुरू होणार असल्याची माहिती रत्नागिरी एसटी विभाग नियंत्रक सुनील भोकरे यांनी दिली आहे. जिल्ह्यासह राज्यातील बहुतांश जिल्हा अंतर्गत सेवा 12 जूनपासून सुरू होणार असून रत्नागिरीत टप्याटप्याने शहर बस वाहतूकसह जिल्हा अंतर्गत सेवा सुरू करण्यात येणार आहे. यापूर्वी एसटी सेवा सुरू करण्यात आली होती. मात्र डेपो स्तरावर सुरू झालेल्या सेवेला प्रतिसाद मिळाला न्हवता. मात्र आता सुरू होणाऱ्या एसटी बसेसमुळे ग्रामीण भागातील जनतेला दिलासा मिळणार आहे. 

जिल्हा अंतर्गत बससेवा सुरू करताना 22 पेक्षा अधिक प्रवाशी एसटीत घेतले जाणार नाही. सोशल डिस्टस्टींगची अंमलबजावणी काटेकोरपणे करण्यात येणार असल्याची माहिती विभाग नियंत्रक सुनील भोकरे यांनी दिली. पहिल्या टप्प्यात रत्नागिरी -जयगड, रत्नागिरी-निवळी, रत्नागिरी-हातखंबागाव, रत्नागिरी-खंडाळा, रत्नागिरी-पावस, रत्नागिरी-पाली, रत्नागिरी-गणपतीपुळे, रत्नागिरी-नाटे, रत्नागिरी-चिपळूण आदी फेऱ्या उद्यापासून सुरू होणार आहेत.