लाॅकडाऊन कालावधीत दुचाकी चालकांवर संक्रांत; सर्वाधिक दंड वसूल

रत्नागिरी:- लॉकडाऊनचा कालावधीत रत्नागिरीत वाहतूक पोलिसांनी चांगलाच फळला आहे. २२ मार्च ते ९ जूनच्या ८० दिवसांच्या कालावधीत वाहतूक पोलिसांनी रेकॉर्डब्रेक वसुली केली आहे. या कालावधीत ३१ हजार ९९५ वाहन चालकांवर कारवाई करुन १ कोटी १५ लाख १८ हजार ५०० रुपये इतका दंड वसूल केला आहे. 
 

राज्यासह जिल्ह्यावरही कोरोनाचे संकट आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्ह्यात संचारबंदी करण्यात आली. मात्र या संचारबंदीच्या कालावधीतदेखील लोक वाहन घेऊन रस्त्यावर फिरताना नियमांचा भंग करत आहेत. अशा वाहनचालकांवर वाहतूक शाखेने कारवाईची जोरदार मोहीम राबवली. लॉकडाऊनच्या ८० दिवसाच्या कालावधीत वाहतूक शाखेने तब्बल १ कोटी १५ लाख १८ हजार ५०० रु.चा दंड वसूल केला आहे. यामध्ये सर्वाधिक कारवाई विना हेल्मेट फिरणाऱ्या वाहन चालकांवर करण्यात आली आहे. अशा १४  हजार ८२७  वाहन चालकांकडून ७४ लाख १३ हजार ५०० रक्कम वसूल करण्यात आली आहे. 

सीट बेल्टचा वापर न करणाऱ्या चालकांना ३ लाख २९ हजार ६००, वाहन चालवताना मोबाईलचा वापर करणाऱ्या ८० जणांकडून १६ हजार रु., इन्शुरन्स नसणाऱ्या ९५ जणांकडून १ लाख २० हजार ३०० रु., लायसन्स नसणाऱ्या ४६७  वाहन चालकांना २ लाख ३३  हजार ५००, फॅन्सी नंबर वापरणाऱ्या ६२४  जणांना १ लाख ३६  हजार , अधिकृत कागदपत्र नसणाऱ्या ५ हजार ७५१ जणांना ११ लाख ५० हजार २०० रु., तिब्बल सीट दुचाकी चालवणाऱ्या २५१ जणांना ५० हजार २०० आणि इतर ६ हजार ५०० जणांना १६ लाख ७२ हजार ४०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.