‘निसर्ग’ वादळ नुकसान पाचशे कोटींच्या घरात?

50 हजार घरे तर 7 हजार हेक्टरवरील बागायती उध्वस्त 

रत्नागिरी:- निसर्ग चक्रीवादळाने मंडणगड, दापोली दोन तालुक्यातील बागाच्या बागा उध्वस्त झालेल्या आहेत. प्रशासनाकडून पंचनामे करण्याचे काम हाती घेण्यात आले असून प्राथमिक अंदाजानूसार 40 ते 50 हजार घरांचे नुकसान झाले आहे. तसेच बागायतींच्या नुकसानीचा आकडा 6 ते 7 हजार हेक्टर इतका आहे. पंचनामे पूर्ण होण्यासाठी काही दिवसांचा कालावधी लागणार असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून प्राप्त झाली आहे. परिस्थितीचा अंदाज घेता नुकसानीचा आकडा सुमारे पाचशे कोटी रुपयांपर्यंत पोचेल असे स्थानिक लोकांकडून वर्तविले जात आहे.

अरबी समुद्रात निर्माण झालेल्या निसर्ग चक्रीवादळाचा लॅण्डींग पॉईंट रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली, मंडणगड आणि श्रीवर्धन किनार्‍याच्या मध्यभागी होता. त्यामुळे सर्वाधिक फटका या दोन्ही किनारपट्टीला बसला आहे. 3 जुनला हे वादळ झाले असून त्यातून सावरण्यासाठी अजून एक महिन्याचा कालावधी लागणार आहे. पहिल्या टप्प्यात जिल्हा प्रशासनाकडून गावोगावी जाणारे रस्ते मोकळे करण्याचे काम हाती घेतले आहे. झाडे रस्त्यावर पडल्यामुळे वाहतुक ठप्प झाली होती. आवश्यक मदत, विजपुरवठा त्यांच्यापर्यंत पोचवणे शक्य नाही. पहिल्या दिवशी जिल्हा प्रशासनाकडून केलेल्या अंदाजानुसार 109 कोटी रुपयांचा फटका बसला असावा अशी शक्यता व्यक्त केली जात होती; परंतु परिस्थितीचा अंदाज घेता हा आकडा सुमारे पाचशे कोटी रुपयांपर्यंत पोचेल असे स्थानिक लोकांकडून वर्तविले जात आहे. एकट्या जिल्हा परिषदेच्या मालमत्तेचे सुमारे पंधरा कोटी रुपयांपर्यंत नुकसान झाले आहे. शासनाला सादर केलेल्या प्राथमिक अहवालानुसार दोन्ही तालुक्यातील 40 हजाराहून अधिक घरे बाधित झाली आहेत. नारळी, पोफळी, आंबा, काजूसह विविध फळझाडांची लागवड असलेले सुमारे 7 हजार हेक्टर बागायती क्षेत्राचे नुकसान या वादळात नष्ट झाले आहे. भरुन न निघणार नुकसान झाले असून त्यातून बाहेर पडण्यासाठी मोठ्याप्रमाणात निधीची गरज भासणार आहे. शासनाकडून 75 कोटी रुपयांची मदत जाहीर केली असली तरीही दोन्ही तालुक्यात झालेल्या नुकसानीची स्थिती पाहता ती अत्यंत्य कमी असल्याचे दिसत आहे. 

दापोली, मंडणगड, गुहागर तालुक्यात झालेल्या नुकसानीमुळे जनजीवन व गावातील दळणवळण पुर्वपदावर आणण्यासाठी आणि पर्नुबांधणीसाठी आपद्ग्रस्तांना तातडीने अन्न, वस्त, निवार्‍याची व मुलभुत गरजांची उपलब्धता आणि शासकीय मदत पुरवण्यासाठी नोडल अधिकार्‍यांची नेमणुक करण्यात आली आहे. त्यात सार्वजनिक बांधकाम, गटविकास अधिकारी, तहसिलदार, कृषी विभाग, पुरवठा अधिकारी, महावितरण, बीएसएनएल, समाजकल्याण विभाग, बँकेचे अधिकारी आणि उपविभागिय पोलीस अधिकार्‍यांची नेमणुक करण्यात आली आहे.