‘निसर्ग’ चक्रीवादळाने पर्यटन व्यवसाय अडचणीत

रत्नागिरी :- निसर्ग चक्रीवादळाचा तडाख्यात जिल्ह्यातील पर्यटन व्यवसाय सापडला आहे. रत्नागिरीतील मिनी महाबळेश्‍वर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दापोली तालुक्‍यातील पर्यटन व्यावसायिकांवर आघात झाला आहे. गेल्या पंधरा वर्षात या व्यावसायातून बस्तान बसवणाऱ्यांची पंचाईत झाली असून त्यांना पुनश्‍च हरिओम म्हणण्याची वेळ आली आहे. जिल्ह्यात रिसॉर्टंसह छोटी – मोठी हॉटेल्स, लॉजिंगचे पत्रे उडाले असून पर्यटकांना भूरळ घालणाऱ्या बागा भकास झाल्या आहेत. त्यातून सावरण्यासाठी शासनाकडून वेगळे धोरण अवलंबावे लागणार आहे. 

कोरोनाच्या टाळेबंदीत कोकणातील पर्यटन व्यवसायचे कंबरडे मोडले आहे. त्यापाठोपाठ आलेल्या निसर्ग चक्रीवादळाने दापोली, मंडणगड तालुक्‍यांना मोठा धक्‍का दिला. यामध्ये दापोली तालुक्‍यातील कर्दे, आंजर्ले, आडे, हर्णै येथील किनारे पर्यटकांनी दरवर्षी फुललेले असतात. गेल्या दहा वर्षांमध्ये या व्यवसायावर हजारो कुटुंबांचा चरितार्थ चालवला जातो. तीन जुनला आलेल्या वादळाने होत्याचं नव्हतं झाले. यामध्ये पर्यटन व्यावसायिक देशोधडीला लागले आहेत. दापोलीपासून पुढे समुद्रकिनारी रांगेत असलेली सगळी रिसॉर्ट उद्‌ध्वस्त झाली आहेत.
मुरुड समुद्र किनारी सिल्व्हर सॅंड नावाचे रिसॉर्ट शैलेश मोरे यांचे आहे. त्यांचे मोठे नुकसान झाले आहे. मुरुड पर्यटन हॉट स्पॉट म्हणून ओळखले जाते. गेल्या काही वर्षात इथल्या सगळ्या पर्यटन व्यावसायिकांनी मेहनत घेतली होती. कष्टाने उभारलेले हे सगळं डोळ्यादेखत नष्ट होताना पहावे लागले आहे. प्रत्येकाला बसलेला आर्थिक फटका काही लाखांच्यावर आहे. पण त्याहून अधिक हे उभारण्यासाठी आणि ते पर्यटकांपर्यंत पोहोचवत जगभरातील पर्यटकांना कोकणात आणण्यासाठी घेतलेल्या मेहनतीचे मोल करता येणार नाही इतके आहे.

वादळानंतर कोकण किनारपट्टीत नेमकी काय अवस्था आहे, हे गावागावात फिरून पाहिले तर लक्षात येते. हे वादळ इथले सर्वसामान्यांचं दैनंदिन जीवन, कदाचित पुढील काही वर्षापर्यंतच अर्थकारणं सारं काही प्रभावित करून गेले आहे. काही रिसॉर्ट चालकांनी विमा उतरवला असेल त्यातून भरपाई मिळेल; परंतु पुन्हा तसेच स्ट्रक्‍चर उभारण्यासाठी बराच कालावधी लागणार आहे. 

चक्रीवादळाने मोठे नुकसान झाले आहे. घरांसह नारळी-पोफळीच्या बागा उद्‌ध्वस्त झाल्या. त्यावर मिळणारे उत्पन्न लोकांनी गमावलेले आहे. तीच परिस्थिती पर्यटन व्यावसायिकांची झाली आहे. दहा वर्षे आम्ही मागे गेलो असून त्यातून उभारी घेण्यासाठी आणखीन काही महिने लागणार आहेत.