‘निसर्ग’ आपद्ग्रस्तांना निकषांपलिकडे जाऊन मदत: ना. सामंत

रत्नागिरी:- निकष बदलून दापोली, मंडणगड येथील चक्रीवादळात बाधित झालेल्यांना मदत केली. अंशतः 6 हजार ऐवजी 10 हजार मदत केली, पूर्णतःच 95 हजाराऐवजी दीड लाख केले, पत्रे देण्याचे निकष नाहीत ती मागणी केली. तत्काळ रॉकेल, कंदील,धान्य देण्याची व्यवस्था केली, का तर लोकांची सरकारला काळजी आहे. गैरसमज पसरविणार्‍यांनी चुकीची माहिती घेऊन निवेदन देण्यापेक्षा नैसर्गिक संकटाला एकत्र येऊन सामोरे जाण्याची गरज आहे, असे आवाहन उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी दिली. 

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. ते म्हणाले, निसर्ग वादळानंतरच्या परिस्थितीबाबत मोठ्या प्रमाणात गैरसमज पसरविला जात आहे. जी मदत 75 कोटीची मदत दिली आहे, ती तातडीची मदत आहे. आज मंडणगड, दापोली तालुक्यातील बाधितांना यापूर्वी जिल्हा प्रशासनाने काही मदत केली आहे. पूर्वी शेती नुकसानीमध्ये हेक्टरी 18 हजार रुपये मदत दिली जात होती. त्यामध्ये तिप्पट वाढ करण्याची मगणी केली आहे. याभागातमध्ये आणखी काही दिवस वीज येण्याची शक्यता कमी आहे. म्हणून काही लोक मेणबत्त्या देत आहेत. मात्र आम्ही अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांच्याशी चर्चा करून तत्काळ कुटुंबाला 5 लिटर रॉकेल, कंदील आणि धान्य, ताडपत्री, कागद दिले जात आहेत. तेथील जनतेची सरकारला काळजी आहे म्हणून निकष बदलून मदत देण्याचे काम सुरू आहे. मात्र काही लोक नैसर्गिक संकटात मदत करण्याऐवजी गैरसमज पसरवीत आहेत. 

एनडीआरएफचे निकष आता बदलण्याची गरज आहे. केंद्र शासनच ते निकष बदलु शकते. राज्य शासनाला तो अधिकार नाही. आरोप करण्यापेक्षा त्याबाबत का प्रयत्न केले जात नाही. घराचे अंशतः नुकसान झाल्यास 6 हजार मिळत होते, ते आम्ही 10 हजार रुपये केले. पूर्णतः नुकसानासाठी 95 हजार मिळत होते. ते 1 लाख 50 हजार रुपये केले. 40 आणि 50 टक्के नुकसानीचा विचार होत नव्हता. त्यांना यामध्ये सामाविष्ट करून घेऊन त्यांना 25 हजार मदत देण्याचा निर्णय घेतला. काळजीपोटी सरकार हे निर्णय घेत आहे. मात्र 2 तास फिरून जुजबी आणि चुकीच्या माहिती आधारे गैरसमज पसरविण्यापेक्षा या संकटाला एकत्र येऊन सामोरे जाण्याची गरज आहे. सुरेश प्रभू यांनी याबाबत चांगले बोलले, या संकटात राजकारण थांबून एकत्र येऊन जनतेला मदत केली पाहिजे. आम्ही त्यांच्यामताशी संमत आहे. पश्‍चिम महाराष्टात उसापासून संत्र्यासाठी सर्व राजकीय नेते पक्ष विसरून एकत्र येतात. मात्र आम्ही भांडत बसतो हे दुर्दैवी आहे.