नव्या लॅबमध्ये चोवीस तासात 51 नमुन्यांची तपासणी

रत्नागिरी:- जिल्हा रूग्णालयात नव्याने सुरू झालेल्या कोविड 19 तपासणी लॅबमध्ये गेल्या 24 तासात 51 नमुन्यांची तपासणी झाली असून त्यातील 2 रूग्णांचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत. 

मंगळवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोकणातील पहिल्या कोविड 19 तपासणी लॅबचे व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे उद्घाटन केले. यापूर्वी या लॅबवरून वादळ उठले होते. ही लॅब सावर्डा येथील एका खासगी रूग्णालयात सुरू करावी अशी मागणी सातत्याने होत होती. तर दुसरीकडे लॅबअभावी जिल्ह्यातील कोरोना संशयित रूग्णांचे नमुने मिरज येथे पाठविले जात होते. त्या ठिकाणी कामाचा ताण अधिक येत असल्याने अहवाल येण्यास विलंब होत होता. त्यातच नमुन्यांची तपासणी करण्यासाठी मर्यादादेखील आली होती. त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यात कोरोनाची तपासणी करण्यासाठी स्वतंत्र लॅब असावी अशी मागणी जोर धरू लागली होती.

मोठ्या प्रमाणात चाकरमानी गावी दाखल होत होते. त्यामुळे बाधित रूग्णांची संख्यादेखील झपाट्याने वाढत होती. अखेर या मागणीचा रेटा अधिकच वाढला. ना. उदय सामंत यांच्यासह खासदार विनायक राऊत व जिल्ह्यातील सर्वच आमदारांनी ही मागणी लावून धरली होती. त्याला यश आल्याने रत्नागिरीत कोविड 19 तपासणी लॅब मंगळवारपासून सुरू झाली. लाखो रूपये खर्च करून ही लॅब अवघ्या काही दिवसात उभी झाली आहे.

लॅबच्या उद्घाटनानंतर अवघ्या 24 तासात एकूण 51 नमुने तपासण्यात आले. त्यापैकी 2 नमुने हे पॉझिटीव्ह आले आहेत. बुधवारी सायंकाळी तपासणीसाठी घेतलेल्या नमुन्यांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. दरम्यान नव्याने सुरू झालेल्या या लॅबमध्ये नमुन्यांची यशस्वी तपासणी होऊ लागली आहे. भविष्यात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नमुने या ठिकाणी तपासणीसाठी येण्याची शक्यतादेखील वर्तविण्यात आली आहे.