रत्नागिरी:- नक्षलग्रस्त भागात दोन वर्षापेक्षा अधिक काळ सेवा बाजाविणाऱ्या व सध्या जिल्ह्यात कार्यरत असलेल्या दोन उपविभागिय पोलीस अधिकारी, दोन पोलीस निरिक्षक यांच्यासह सात पोलीस अधिकाऱ्यांना केंद्र सरकारच्या गृह विभागांना आंतरिक सेवा पदक जाहिर केले आहे. रत्नागिरीचे उपविभागिय पोलीस अधिकारी श्री.गणेश इंगळे, चिपळूणचे उपविभागिय पोलीस अधिकारी श्री. नवनाथ ढवळे, रत्नागिरी ग्रामीण पोलीस निरीक्षक श्री. सुरेश कदम, रत्नागिरी जिल्हा वाहतूक पोलीस निरीक्षक श्री. अनिल विभूते, सहाय्यक पोलीस निरिक्षक सुशांत वराळे, पोलीस उपनिरिक्षक राज पन्हाळे, संदिप वायगंणकर अशा सात अधिकाऱ्यांना हे पदक मिळाले आहे.
गडचिरोली, चंद्रपूर, गोंदिया सारख्या अत्यंत संवेदनशील आणि नक्षलग्रस्त भागात दोन वर्षे आणि त्यापेक्षा जास्त काळ सेवा बजावणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांना केंद्र सरकारच्या गृह मंत्रालयामार्फत पदक देऊन गौरव केला जातो. गडचिरोली, गोंदिया सारख्या अत्यंत कठीण आणि नक्षलग्रस्त भागात सेवा बजावताना अनेक सामाजिक उपक्रम राबवून तेथील नक्षलवाद्यांचे मत परिवर्तन करण्याचे महत्वाचे काम देखील अधिकार्यांनी केले आहे. रत्नागिरी जिल्ह्यात काम करताना देखील या अधिकार्यांनी चमकदार कामगिरी केली आहे.
सातही अधिकारी सन २००० ते २०१८ या कालावधीत नक्षलग्रस्त भागात सेवेत होते. रत्नागिरीचे उपविभागिय पोलीस अधिकारी श्री. गणेश इंगळे, चिपळूणचे उपविभागिय पोलीस अधिकारी श्री. नवनाथ ढवळे, पोलीस निरिक्षक अनिल विभूते, सहाय्यक पोलीस निरिक्षक सुशांत वराळे, पोलीस उपनिरिक्षक राज पन्हाळे, संदिप वायगंणकर यांनी पोलीस दलात सेवेला सुरुवात करतानाच त्यांची नियुक्ती नक्षलग्रस्त भागात झाली होती. तर ग्रामीण पोलीस निरिक्षक सुरेश कदम यांनी तब्बल तीन वर्षे या भागात उत्तम सेवा करत तेथील गुन्हेगारी रोखण्यात यश मिळविले होते.त्यांच्या कामाची दखल घेत केंद्र सरकाने त्यांना आंतरिक सेवा पदकाने सन्मानित केले आहे.