मंदिरांचे दरवाजे उघडलेच नाहीत; भक्तांच्या नशिबी प्रतिक्षाच

रत्नागिरी:- मंदिरे उघडणार… उघडणार अशी बातमी वार्‍यासारखी पसरली आणि भाविकांचा आनंद गगनात मावेनासा झाला मात्र राज्य शासनाचे तसे कोणतेही निर्देश न आल्याने जिल्ह्यातील सर्व मंदिरांचे दरवाजे बंद होते. श्री क्षेत्र गणपतीपुळे आणि श्री क्षेत्र मार्लेश्‍वर ही देवस्थाने १ जुलैपासून सुरु होतील असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

लॉकडाऊनला २ महिन्याचा कालावधी उलटून गेला. आता पाचव्या टप्प्यातील लॉकडाऊन सुरु झाले आहे. ३० जूनपर्यंत हे लॉकडाऊन जारी करण्यात आले आहे. मात्र या लॉकडाऊनमधून काही सेवांना वगळण्यात आले आहे. मात्र धार्मिक  स्थळे, शाळा, महाविद्यालये, राजकीय पक्षांचे जाहीर कार्यक्रम आदींवर बंधने कायम ठेवली आहेत. २ महिन्याचा कालावधी उलटून गेला तरी सर्वच धर्मियांची धार्मिक स्थळे लॉकडाऊनमध्ये आहेत. ८ जूनपासून या धार्मिक स्थळांचे दरवाजे उघडतील असा अंदाज होता. गेले २ दिवस त्याबाबत सोशल मिडीयावर वृत्त पसरत होते. त्यामुळे भाविकांना ही सुखद बातमी ठरली होती.

मात्र ८ जूनची सकाळ उजाडली तरी जिल्ह्यातील सर्वच धार्मिक स्थळांचे दरवाजे बंदच होते. गणपतीपुळे देवस्थान उघडेल अशी आशा अनेकांना होती, मात्र देवस्थानच्या कमिटीने येथील पुजारी यांना त्याबाबतचे कोणतेही लेखी निर्देश न मिळाल्याने गणपतीपुळे देवस्थान हे बंदच होते.