बाजार समितीकडून काजू बी तारणापोटी पंचवीस लाख रुपयांचे वाटप

रत्नागिरी:- कृषी उत्पन्न बाजार समितीच्या तारण योजनेंतर्गत 44.32 टन काजू बी घेण्यात आली असून त्यापोटी आतापर्यंत 24 लाख 81 हजार रुपयांचे वाटप करण्यात आले आहे. या योजनेला शेवटच्या टप्प्यात चांगला लाभ मिळत असून प्रतिकिलो 56 रुपये दर बाजार समितीने दिला आहे. अजून काही प्रस्ताव बाजार समितीकडे प्राप्त असून त्यावर कार्यवाही सुरु आहे.
रत्नागिरी जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समितीतर्फे सलग तिसर्‍या वर्षी शेतमाल तारण योजनेंतर्गत काजू बी घेण्यास सुरवात केली आहे. यंदा एक कोटीचे उद्दिष्ट ठेवण्या आले आहे. काजूचे उत्पादन कमी असताना लॉकडाऊनमुळे काजूला उठाव नाही, शिवाय दरही कमी आहे. बाजारभाव कमी असल्यामुळे तारण कर्जाचा दर किलोला 56 रुपये ठेवण्यात आला आहे. गेल्या दोन वर्षात 80 ते 100 रुपये दर किलोमागे होता. त्याचा फायदा शेतकर्‍यांना झाला होता. जुलै महिन्यात चांगला दरही मिळाला. यंदा परिस्थिती उलट असून टाळेबंदीमुळे शेतकर्‍यांना रोख रकमेची गरज आहे. त्यामुळे काही शेतकर्‍यांनी आपल्याकडील बी तारण योजनेंतर्गत ठेवण्यासाठी पाऊल टाकले आहे. सुरवातीला दर चांगला मिळत असल्याने शेतकरी तारण ठेवण्यासाठी येत नव्हते. मे महिन्याच्या अखेरच्या टप्प्यात याला प्रतिसाद मिळू लागला आहे. काजू बीच्या 1008 पोटी लांजा, राजापूर तालुक्यात तारण म्हणून ठेवण्यात आली आहेत. आतापर्यंत 44 हजार 320 किलो बी प्राप्त झाली असून त्यापोटी 24 लाख 81 हजार 920 रुपये शेतकर्‍यांना वाटप करण्यात आले आहे. तारण ठेवलेली बी चांगला दर मिळतो तेव्हा विकण्यासाठी बाहेर काढली जाते.