जिल्ह्यात अजूनही 161 वाड्यांना पाणी टंचाईची झळ

रत्नागिरी :- निसर्ग चक्रीवादळामुळे चार दिवसांपुर्वी जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडला असला तरीही अद्याप जिल्ह्यातील टंचाईग्रस्त गावांच्या संख्येत घट झालेली नाही. जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार जिल्ह्यातील 80 गावातील 161 वाड्यांना अजूनही टँकरने पाणी दिले जात आहे. याचा लाभ सुमारे साडेतेवीस हजार लोक घेत आहेत.
जुन महिन्याच्या पहिल्या दिवशी जिल्ह्यात मुसळधार पावसाचे आगमन झाले; मात्र चक्रीवादळाचा जोर ओसरला आणि पाऊसही गायब झाला. अधूनमधून एखादी पावसाची सर पडते. यंदाच्या उन्हाळी मोसमात जिल्ह्यात गुहागर, राजापूर, रत्नागिरी या तिन तालुक्यात एकही टँकर धावलेला नाही. खेड, चिपळूण व संगमेश्‍वर तालुक्यात सर्वाधिक गावांमध्ये पाणीटंचाई जाणवली. गेल्या आठवड्याच्या तुलनेत चार गावांची भर पडली आहे. आतापर्यंत 7 सार्वजनिक आणि 11 खासगी टँकर सुरु असून 1481 फेर्‍याद्वारे 23 हजार 571 लोकांना पाणीपुरवठा झाला आहे.