कोरोना विषाणू चाचणी प्रयोगशाळेचे व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे उद्घाटन

रत्नागिरीसाठी वैद्यकीय महाविद्यालय मंजूर करण्याची मुख्यमंत्र्यांची ग्वाही

रत्नागिरी:- विषाणू प्रयोगशाळेच्या निमित्ताने आरोग्य विषयक मुलभूत सुविधेत वाढ झाली आहे. या पुढे आता कोरोना विषयक चाचण्यांची गती वाढेल. याचा जिल्ह्यातील सर्वांना फायदा होणार आहे. आता येथे वैद्यकीय महाविद्यालयाची मागणी आहे तर त्याचा प्रस्ताव करा ते देखील करु, असे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी प्रयोग शाळेच्या ऑनलाईन उद्घाटन प्रसंगी सांगितले.

येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात 1 कोटी 7 लाख रुपये खर्चाने विषाणू प्रयोग शाळा उभारण्यात आली आहे.याचे उद्घाटन आज झाले.व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून मुख्यमंत्री ठाकरे यांनी उद्घाटन केले. ठाकरे कुटुंब आणि कोकण यांचे विशेष नाते सर्वांना माहिती आहे. माझे आजोबा संयुक्त महाराष्ट्र चळवळीत अग्रणी होते आणि आज मुख्यमंत्री आहे त्यामुळे सर्व महाराष्ट्रासाठी मी काम करीत आहे, असे ते म्हणाले.

तळकोकणात रत्नागिरी आणि सिंधुदूर्ग या दोन जिल्हयांमध्ये अशा स्वरुपाची प्रयोगशाळा उभारण्यास विशेष मंजूरी मुख्यमंत्री ठाकरे यांनी दिली आणि त्यानंतर अवघ्या 14 दिवसात सर्व प्रक्रिया पूर्ण करुन ही अद्ययावत अशी प्रयोगशाळा उभारण्यात आली आहे. याच्या यंत्रे व उपकरणे यासाठी 80 लाखांहून अधिक खर्च झाला असून बांधकामासाठी 15 लाखांचा खर्च झाला. अतिशय गतिमान पध्दतीने सुविधा निर्माण केल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी प्रशासनाचे यावेळी अभिनंदन केले.

लॉकडाऊन सुरु झाला त्याचा उपयोग आरोग्य सुविधांची वाढ करण्यासाठी करावा हे धोरण ठेवून राज्यात काम सुरु आहे असे सांगून ते म्हणाले की कोव्हीड-१९ चे संकट सुरु झाले त्यावेळी राज्यात केवळ 2 प्रयोगशाळा होत्या आता ही संख्या ८५ झाली आहे.संकटाचे रुपांतर संधीत केल्याने या सुविधा निर्माण झाल्या आहेत.नागरिकांना तपासणीसाठी फार दूर जावे लागणार नाही यासाठी सुविधा निर्माण करताना त्या तपासणीचे दर देखील त्यांच्या आवाक्यात आणणे हे यापुढील काम सरकारचे असेल असे मुख्यमंत्री म्हणाले.