लॉकडाऊनचा घरपट्टी वसुलीला फटका

रत्नागिरी:- घरपट्टी माध्यमातून कोट्यवधीचा महसुल मिळणार्‍या रत्नागिरी पालिकेला लॉकडाऊनचा मोठा फटका बसला आहे. यंदा सुमारे 12 कोटीचे उद्दिष्ट पालिकेसमोर होते. मात्र आतापर्यंत केवळ 6 कोटी 60 लाखाच्या दरम्यान घरपट्टी वसूल झाली आहे. लॉकडाऊनमुळे घरपट्टी वसुलीचा टक्का गेल्या वर्षीच्या तुलनेत 14.40 टक्क्यांनी घसरला आहे. याचा फटका नगर परिषदेच्या उत्पन्नाला बसला आहे. घरपट्टी वसुलीचा आलेख खाली आल्याने नगर परिषदेचे उत्पन्न घटले आहे. शासनाने सर्वांनाच सवलत दिल्याने पालिका वसुलीसाठी सक्तीही करू शकत नसल्याने पालिका आर्थिक अडचणीत सापडली आहे. उत्पन्नाचा मोठा स्रोत कमी झाल्याने विकासकामे अडचणीत येण्याची शक्यता आहे.