परिस्थितीवर मात करत अखेरच्या टप्प्यात हापूस कॅनडाला

रत्नागिरी:- कोरोना आणि ‘निसर्ग’ चक्रीवादळामुळे निर्माण झालेल्या प्रतिकुल परिस्थितीवर मात करत हंगामाच्या अखेरच्या टप्प्यात साडेबाराशे किलो हापूस रत्नागिरीतील प्रक्रिया केंद्रातून थेट कॅनडाला पाठविण्यात आला आहे. रत्नागिरीतील मँगो पॅराडाईज अ‍ॅण्ड एक्स्पोर्ट या कंपनीमार्फत हा प्रयत्न करण्यात आला होता.

रत्नागिरीतील बागायदारांनी एकत्र येऊन ही कंपनी स्थापन केली असून गतवर्षी त्यांनी अमेरिकेला हापूस निर्यात केला होता. आंबा निर्यात प्रक्रिया केंद्र असूनही रत्नागिरीतून हापूस निर्यात करण्यासाठी स्थानिक बागायतदार पुढे येत नाहीत. त्यामुळे रत्नागिरीतील बागायतदारांकडून वाशी बाजार समितीमधील निर्यातदारांकडे गेलेला हापूस परदेशात पाठविला जातो. जिथे पिकतो तिथून निर्यात करण्यासाठी बागायतदारांची संख्या अत्यल्प आहे. त्यात यंदा कोरोनामुळे निर्यातीवर बंधने आली होती. प्रतिकुल परिस्थितीत रत्नागिरीतील मँगो पॅराडाईज अ‍ॅण्ड एक्स्पोर्ट कंपनीचे प्रसन्न पेठे, रजनिश महागावकर, अमित मुळे या तिघांनी स्वतःच्या बागेतील साडेबारोश किलो आंबा निर्यात केला.

गतवर्षी मँगो पॅराडाईज अ‍ॅण्ड एक्स्पोर्ट या कंपनीमार्फत अमेरिकेला दोन शिपमेंट पाठविण्यात आल्या होत्या. कोरोनामुळे यंदा निर्माण झालेल्या परिस्थितीचा हापूसच्या निर्यातीवर परिणाम झाला आहे. परदेशातील निरीक्षक भारतात येऊ न शकल्यामुळे पुढील प्रक्रिया होऊ शकली नाही. त्यामुळे अमेरिकेसह अन्य देशांमध्ये हापूस रत्नागिरीतील प्रक्रिया केंद्रातून जाऊ शकला नाही. शेवटच्या टप्प्यात रत्नागिरीतील मँगो पॅराडाईज अ‍ॅण्ड एक्स्पोर्ट कंपनीने कॅनडाला आंबा पाठविण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार पणनचे उपसरव्यवस्थापक मिलिंद जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली निर्यातीसाठी आवश्यक कागदपत्रे जमा केली. आंब्यासाठी कृषी विभागाकडून फायटो सर्टिफिकेट घेण्यात आले. पणनच्या आंबा निर्यात केंद्रात साडेबाराशे किलो आंबा एक डझनच्या बॉक्समध्ये भरुन विशिष्ठ तापमानाखाली वातानुकूलित खोलीत ठेवण्यात आले होते. एक दिवस ही प्रक्रिया झाल्यानंतर 2 जूनला रत्नागिरीतून आंबा वातानुकूलीत गाडीतून मुंबईत विमानतळाकडे रवाना झाला; मात्र 3 जूनला आलेल्या निसर्ग चक्रीवादळाने त्याचा प्रवास थांबला. त्या दिवशीची विमाने रद्द झाल्यामुळे 4 जूनला दुपारी चार वाजता हापूसचा विमान प्रवास सुरु झाला. दोन दिवसांनी रत्नागिरीचा हापूस कॅनडाच्या बाजारात पोचला. यंदा कोरोनामुळे मोजकीच विमाने सुरु असल्यामुळे हवाई भाडे गतवर्षीच्या तुलनेत दुप्पट आहे. किलोला दोनशे रुपयेप्रमाणे दर आकारण्यात आला आहे. तसेच कॅनडात डझनला सर्वसाधारणे 22 ते 24 डॉलर दर मिळण्याची अपेक्षा बागायतदारांकडून आहे.

याबाबत रत्नागिरीचे आंबा बागायतदार आणि परॉडाईज कंपनीचे प्रसन्न पेठे म्हणाले, यंदा कोरोनामुळे अमेरिकेतील फूड इन्स्पेक्टर येऊ न शकले नाहीत. निर्यातीसाठी आवश्यक परवानग्या न मिळाल्यामुळे यंदा मागणी असूनही तिकडे हापूस पाठवू शकलो नाही. त्यामुळे कॅनडात हापूस सहजरित्या जात असल्यामुळे तिकडे निर्यातीसाठी यशस्वी प्रयत्न केले.