जिल्हा नाभिक समाजाचे ‘हत्यारबंद’ आंदोलन

रत्नागिरी:- कोरोना प्रतिबंधक लॉकडाऊनमुळे उपासमार होत आहे. शासन सलून उघडण्यास परवानगी देत नसल्याने संतप्त झालेल्या जिल्हा नाभिक समाज संघटना मंगळवार पासून हत्यारबंद आंदोलन सुरू करणार असून लोकशाहीच्या मार्गाने आणखी तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे.  

मंगळवार (९ जून) पासून प्रशासन आणि लोकप्रतिनिधींना निवेदने देण्यात येणार आहेत. लॉकडाऊन आणि उपासमारीच्या पार्श्वभूमीवर पुढील दिशा ठरवण्यासाठी चिपळूणमध्ये बैठक झाली. यावेळी समाज बांधवांनी आपली व्यथा मांडून होत असलेल्या उपासमारीमुळे जगणे मुश्किल झाल्याचे म्हटले. गेले तीन महिने सलून व्यवसाय बंद असल्याने कुटुंबाची गुजराण कशीतरी चालू आहे. मात्र आता सहनशक्ती संपली असून शासन दुकाने उघडण्यास परवानगी देत नसेल तर उपाशी मारण्यापेक्षा रस्त्यावर उतरू आणि आपला हक्क मिळवू, असे अनेकांनी सांगितले. त्यानुसार आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्यासाठी रत्नागिरी तालुकाध्यक्ष श्रीकृष्ण तथा बावा चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली सर्व तालुकाध्यक्ष आणि जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची एक आंदोलन समिती स्थापन करण्यात आली आहे.

शासनाने सलून दुकान उघडण्यास परवानगी द्यावी, नाभिक समाजातील प्रत्येक कुटुंबाच्या खात्यात 15 हजार रुपये जमा करावेत, सलून व्यावसायिकाला ५० लाखांचे विमा संरक्षण तसेच सुरक्षितता किट आदी शासनाने ताबडतोब देऊन नाभिक समाजाला या संकटातून बाहेर काढावे, अशी मागणी करण्यात आली. नाभिक बांधव सर्व प्रकारची खबरदारी आणि दक्षता घेत असूनही सलून बंदीचा आदेश काढण्यात येतो, हे पूर्णपणे चुकीचे असल्याचे मत श्रीकृष्ण चव्हाण यांनी मांडले. जिल्ह्यातील सर्व नाभिक हत्यारबंद आंदोलन करणार आहेत. यापुढे कोणीही कोणाच्याही घरी जाऊन कोणत्याही नेत्याची, पुढाऱ्याची, अधिकाऱ्याची केस-दाढी करणार नाही. कोणत्याही विधिकार्याला नाभिक बांधव काम करणार नाही. जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत हे चालू राहील, असे यावेळी जाहीर करण्यात आले. याबरोबरच या बैठकीत ठरल्यानुसार मंगळवारी (दि. ९ जून) सकाळी ११ वाजता प्रत्येक तालुक्यातील तहसीलदार, प्रांताधिकारी, पोलीस निरीक्षक, स्थानिक आमदारांना आपल्या मागण्यांचे निवेदन देण्यात येतील. त्यानंतरही सलून चालू करण्यास परवानगी मिळाली नाही, तर तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला.