गोगटे महाविद्यालयात 40 कैदी क्षमतेचे तात्पुरते कारागृह

रत्नागिरी:- रत्नागिरी विशेष कारागृहात महिला कैदी ठेवण्यास जागा उपलब्ध नसल्याने शहरातील गोगटे जोगळेकर महाविद्यालयात तात्पुरते कारागृह उभारण्याचा निर्णय जिल्हाधिकारी लक्ष्मी नारायण मिश्रा यांनी घेतला आहे. 20 पुरुष आणि 20 महिला असे 40 कैद्यांच्या क्षमतेचे कारागृह गोगटे जोगळेकर महाविद्यालयात उभारण्यात येणार आहे.

रत्नागिरी विशेष कारागृह 243 पुुरुष तर 3 महिला इतक्याच क्षमतेचे आहे. 3 महिला बंदी ठेवण्याची क्षमता असताना सद्यस्थितीत जिल्हा कारागृहात 11 महिला बंदी बंदिस्त आहेत. असा अहवाल स्वतः कारागृह अधीक्षक यांनी जिल्हाधिकारी यांना दिला आहे. महिला बंदी ठेवण्यासाठी पुरेशी जागा नसल्याने जागा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी जिल्हा प्रशासनाकडे करण्यात आली होती.

कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर कारागृहात दाखल होणाऱ्या नव्या कायद्यांचे विलगिकरण करणे अत्यंत आवश्यक असल्याचे नमूद करण्यात आले होते. यामुळे 20 पुरुष आणि 20 महिला अशा 40 कैद्यांच्या क्षमतेचे तात्पुरते कारागृह तत्काळ उभारावे अशी मागणी जिल्हा प्रशासनाकडे करण्यात आली होती. या अन्वये पोलीस अधीक्षक डॉ. मुंढे यांनी रत्नागिरी शहर पोलीस ठाणे हद्दीतील गोगटे जोगळेकर महाविद्यालय येथे तात्पुरते कारागृह उभे करण्याच्या अभिप्राय दिला. या ठिकाणी योग्य त्या सुविधा आणि आवश्यक खबरदारी घेऊन तात्पुरते कारागृह उभारण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत. गोगटे जोगळेकर महाविद्यालयातील वाणिज्य विभागात हे कारागृह उभारण्यात येणार आहे.