47 पैकी 42 वीज उपकेंद्रे सुरु करण्यात महावितरणला यश

रत्नागिरी:- तीन दिवसांपूर्वी आलेल्या ‘निसर्ग’ चक्रीवादळाचा महावितरणला मोठा फटका बसला असून, चक्रीवादळाच्या या तडाख्यातून सावरण्यासाठी ऊर्जामंत्री ना. डॉ. नितीन राऊत यांनी युद्धपातळीवर यंत्रणा राबविली आहे. व्हिडीओ कॉन्फरसिंगच्या माध्यमातून ते दररोज परिस्थितीचा आढावा घेत आहेत. परिणामी आतापर्यंत 47 पैकी 42 उपकेंद्रे पूर्ववत सुरु करण्यात यश आले आहे. तर जिल्ह्यातील 4 लाख 21 हजार बाधित वीजग्राहकांपैकी 3 लाख 66 हजार ग्राहकांचा वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला आहे.

निसर्ग चक्रीवादळाने अनेकांचे संसार उद्धवस्त केले. वीज यंत्रणा उघड्यावर असल्याने या आस्मानी संकटातून महावितरणही सुटले नाही. वादळाच्या दुसऱ्याच दिवशी ऊर्जामंत्री ना. डॉ. नितीन राऊत यांनी रायगड जिल्ह्याचा दिवसभर दौरा करुन वादळामुळे कोलमडलेली यंत्रणा सावरण्याचे निर्देश महावितरणला दिले. त्यासाठी लागणारी सामुग्री, मनुष्यबळ शेजारच्या जिल्ह्यातून तातडीने पाठविण्यास सांगितले. त्यामुळे रत्नागिरीला दुसऱ्याच दिवशी कोल्हापूर परिमंडलाकडून सहा व बारामती परिमंडलाकडून तीन अशी 9 पथके रवाना झाली. दुरुस्तीसाठी आवश्यक साधनसामुग्री व वाहनांसह ही सर्व पथके खेड व चिपळूण विभागात कार्यरत आहेत.

शनिवारी दुपारी ऊर्जामंत्री ना. डॉ. राऊत यांनी व्हिडीओ कॉन्फरसिंगच्या माध्यमातून पुन्हा आढावा घेतला. या व्हीसीला महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. दिनेश वाघमारे, कोकणचे सहव्यवस्थापकीय संचालक श्री. गोविंद बोडके, संचालक श्री. दिनेशचंद्र साबू, कार्यकारी संचालक श्री. अरविंद भादीकर, मुख्य अभियंता सौ. रंजना पगारे व अधीक्षक अभियंता श्री. देवेंद्र सायनेकर उपस्थित होते.

रत्नागिरी जिल्ह्यात उच्चदाबाचे 2927 तर लघुदाबाचे 4897 खांब वादळाने जमीनदोस्त झाले आहेत. तर 47 उपकेंद्रांचा वीजपुरवठा ठप्प झाला. तीन दिवसांत वीज कर्मचाऱ्यांनी केलेल्या कामामुळे 42 उपकेंद्रांचा वीजपुरवठा सुरु करण्यात आला. बंद असलेल्या गुहागर, वेळणेश्वर, केळशीफाटा, हरणे व वनौशी उपकेंद्रांपैकी वेळणेश्वर व वनौशी उपकेंद्र आज उशिरापर्यंत सुरु करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. तर गुहागर उपकेंद्र बंद असले तरी त्यावरील ग्राहकांचा वीजपुरवठा दुसऱ्याच दिवशी श्रृंगारतळी उपकेंद्रातून पर्यायी मार्गाने सुरु केला आहे.

कोरोनाच्या अनुषंगाने जिल्ह्यातील सहा कोरोना रुग्णालयांचा वीजपुरवठा अनुक्रमे पहिल्या दिवशी दोन व राहिलेला दुसऱ्यादिवशी सुरळीत करण्यात आला. काही भाग वगळता रत्नागिरी व चिपळूण शहरांचा वीजपुरवठा वादळाच्या दिवशी व खेडचा दुसऱ्या उशिरा सुरु झाला. वीजपुरवठा सुरु करताना सर्वप्रथम अत्यावश्यक सेवांना प्राध्यान्य देण्याचेही ऊर्जामंत्र्यांनी अधिकाऱ्यांना सांगितले.