रत्नागिरी तालुक्यातील 93 गावात ‘निसर्ग’चे पडसाद; दीड हजार झाडे जमीनदोस्त 

रत्नागिरी:- निसर्ग च्रकीवादळाचा तडाखा रत्नागिरी तालुक्यातील किनारीपट्टी भागाला मोठ्याप्रमाणात बसला. सुमारे 93 गावातील बागायतींचे दीड हजार झाडांचे नुकसान झाले असून जयगडमधील भाजीपाल्यासाठी केलेल्या पाच शेडचे मिळून सुमारे साडेपाच लाख रुपयांचा फटका शेतकर्‍यांना बसला आहे.
गोव्यातून कोकणात दाखल झालेल्या चक्रीवादळाचा पहिला प्रभाव रत्नागिरी तालुक्यात जाणवत होता. ताशी 40 ते 50 किलोमीटर वेगाने वारे वाहत होते. जयगड, वरवडे, मालगुंड, गणपतीपुळे या किनारी भागांतील लोकांना याची तिव्रता अधिक होती. वेगवान वार्‍यामुळे आंबा, फणस, काजू, सुपारी, नारळाची झाडे मुळासह उन्मळून गेली आहेत. किनारी भागांबरोबरच अन्य गावांमध्येही काही प्रमाणात नुकसान झाले आहे. वादळाबरोबर मुसळधार पाऊसही कोसळत होता. कृषी विभागाच्या योजनेतून अनुदान घेऊन दोन वर्षांपुुर्वीपासून जयगड येथील पाच शेतकर्‍यांनी भाजीपाला लागवडीसाठी पाच शेडनेट तयार केली होती. वार्‍यामुळे सर्वच शेडनेटचे छत मोडून पडले आहेत. पावसाचे पाणी भाजीपाल्यात घुसल्यामुळे उरलेली भाजीचेही नुकसान झाले आहे. शासनाच्या योजनेतून एका शेडनेटसाठी सहा ते सात लाख रुपये खर्च येतो. त्यातील अडीच लाख रुपये अनुदानापोटी शेतकर्‍यांना मिळाले आहे. मधुकर महादेव बंडबे, संजय जानू बडंबे, संजय अनंत बैकर, सुरेश शिगवण, दिपक बैकर या पाचजणांच्या शेडनेटचे नुकसान झाले आहे. पाचही शेडनेटचे मिळून सुमारे पाच ते साडेपाच लाखाचा फटका बसला आहे. ते सगळे दुरुस्त करण्यात येणार आहे.
वादळात झालेल्या नुकसानीचे पंचनामे कृषी विभागाकडून केले जात आहे. आतापर्यंत 310 शेतकर्‍यांचे पंचनामे झाले असून 950 झाडे बाधित झालेली आहेत. सुमारे साडेनऊ हेक्टरवरील बागायतींना फटका बसलेला आहे. शासकीय आकडेवारीनुसार दोन ते तीन लाख रुपये तर प्रत्यक्षात 25 ते 30 लाखाचे नुकसान झाले असावे असे शेतकरी सांगतात. तालुक्यात सुमारे दीड हजार फळझाडांचे नुकसान झाले असावे असा प्राथमिक अंदाज वर्तविला जात आहे. शासनाच्या निकषानुसार हेक्टरी 15 हजार रुपये भरपाई दिली जाते. तर एक किंवा दोन झाडे असल्यास एक हजार रुपये दिले जातात. पावस येथील बागायतदाराने नव्याने लागवड केलेली आंब्याची 45 झाडांचे नुकसान झाले आहे.