रत्नागिरी:- निसर्ग चक्रीवादळाचा तडाखा मच्छीमारांनाही बसला असून जिल्ह्यातील सुमारे पन्नासहून अधिक नौकांचे नुकसान झाले आहे. त्याचे पंचनामे करण्याचे काम मत्स्य विभागाकडून सुरु असल्याची माहिती सहाय्यक मत्स्य व्यावसाय अधिकारी एन. व्ही. भादुले यांनी दिली.
निसर्ग चक्रीवादळाचा तडाख्याने जिल्ह्यात ठिकठिकाणी नुकसान झाले आहे. वादळ धडकणार असल्याची सुचना मिळाल्यानंतर मत्स्य विभागाकडून तत्काळ सुरक्षिततेसाठी जिल्ह्यात सुचना देण्यात आल्या होत्या. त्यानुसार मच्छीमारांनीही काळजी घेतली. त्यामुळे मोठा फटका बसला नाही. तरीही वादळाची तिव्रता अधिक असल्यामुळे जेटीवर लावलेल्या नौका एकमेकांवर आदळून नुकसान झाले आहे. राजापूर तालुक्यातील कशेळी-बावकरवाडी येथील मच्छीमार सुनिल दिनकर फणसे यांच्या नौकेचे सुमारे 60 ते 70 हजार रुपयांचे नुकसान झाले. जिल्ह्यात सर्व मिळून पन्नासहून अधिक होड्यांचे नुकसान झाले असावा असा अंदाज आहे. दापोली, मंडणगड या दोन तालुक्यातील किनारी भागातील नौकांना फटका बसला आहे. दापोली केळशीत लाकडी छोट्या बोटीचे पूर्णतः नुकसान झाले आहे. मिरकरवाडा येथील 12 ट्रॉलर्स, पाच बलाव यांचा समावेश आहे.