‘निसर्ग’च्या तडाख्यात महावितरणचे 25 कोटीचे नुकसान

रत्नागिरी:- निसर्ग वादळाचा सर्वांत जास्त तडाखा महावितरण कंपनीला बसला आहे. महावितरण कंपनीचे प्राथमिकदृष्ट्या हजाराच्यावर विद्युत खांब पडले आहे. रोहित्र जळण्यापासून मुख्य वाहिनी, जोडण्या तुटल्या आहेत. सुमारे 25 कोटीच्यावर महावितरणचे नुकसान झाले आहे. अहोरात्र काम करूनही सुमारे पावणे सहा लाख ग्राहकांपैकी अजून 1 लाख 50 हजार महावितरणचे ग्राहक अंधारात आहेत, अशी माहिती मंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत दिली.  
उदय सामंत म्हणाले, निसर्ग चक्रीवादळाने मंडणगड, दापोली, गुहागर या तीन तालुक्यांना सर्वाधिक फटका बसला आहे. मोठ्या प्रमाणात किनारी भागाची पडझड झाली आहे. घरं, गोठे, झाडे आदी पडले आहेत. मात्र याबरोबर सर्वांत जास्त जर कोणाचे नुकसान झाले असले तर महावितरण कंपनीचे झाले आहे. कंपनीचे सुमारे हजाराच्यावर विद्युत खांब पडले आहेत. रोहित्र जळाली आहेत, विद्युत वाहिन्या तुटल्या आहेत, ग्राहकांनी दिलेल्या जोडण्या तुटल्या आहेत.  
मोठ्या प्रमाणात महावितरण कंपनीचे नुकसान झाले आहे. निसर्ग वादळाची पूर्व कल्पना मिळाल्यानंतर महावितरण कंपनीने खबरदारी घेतली होती. एकूण 5 लाख 75 हजार वीज ग्राहकांपैकी 4 लाख 20 हजार ग्राहकांचा विद्युत पुरवठा खंडित करण्यात आला होता. त्यानंतर 2 लाख ग्राहकांचा विद्युत पुरवठा सुरू झाला. मात्र पडझडीमुळे अजूनही या भागातील सुमारे दीड लाख ग्राहक अजून अंधारात आहेत. त्यांना वीज जोडणी देण्यास आणखी दोन तीन दिवस जाण्याची शक्यता आहे. महावितरणच्या अधिकारी आणि कर्मचार्‍यांचेही कौतुक करावे तेवढे थोडे आहे, कारण विद्युत पुरवठा पूर्ववत होण्यासाठी दिवसरात्र मेहनत घेत आहेत, अशी कौतुकाची थापही त्यांनी दिली.