जहाज प्रकरणी प्रशासन सुस्त; ग्रामस्थांची गस्त

ग्रामस्थांसह सागरी सीमा मंचाच्या कार्यकर्त्यांची प्रादेशिक बंदर अधिकारी कार्यालयावर धडक

रत्नागिरी : निसर्ग चक्रीवादळामुळे तीन दिवसापूर्वी अँकर तुटून मिर्‍या किनार्‍यावर धडकलेले एम. टी. बसरा स्टार जहाज अद्यापही तिथेच अडकले आहे. त्यातील तेलगळतीमुळे मिर्‍या ग्रामस्थांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले असून आज ग्रामस्थांसह सागरी सीमा मंचाच्या कार्यकर्त्यांनी प्रादेशिक बंदर अधिकारी कार्यालयावर धडक मारली. जहाजाच्या मालकाचे नाव शोधण्यात प्रशासनाने तीन दिवस घालवले. जिल्हा प्रशासनाने याकडे अक्षम्य दुर्लक्ष केले असून दुर्घटना घडल्यास मोठ्या प्रमाणात जीवित, वित्तहानी होण्याची भीती ग्रामस्थांमध्ये आहे.

ग्रामस्थ व सागरी सीमा मंचाच्या कार्यकर्त्यांनी आज सकाळी जहाज व किनार्‍याची पाहणी केली. त्यानंतर ते महाराष्ट्र मेरिटाईम बोर्ड, प्रादेशिक बंदर विभागावर धडकले. 3 जून रोजी निसर्ग चक्रीवादळामुळे जय हिंद चौक, भाटीमिर्‍या येथील समुद्रकिनारी भले मोठे मालवाहू लोखंडी जहाज बंद स्थितीत येऊन थडकले. भरतीच्या वेळी समुद्राच्या खवळलेल्या लाटांमुळे हे जहाज बंधार्‍याला जोरजोरात आपटत आहे. त्यामुळे तेथील घरांना जोराचे हादरे बसत आहेत. हे हादरे असेच बसत राहिले तर तेथील घरांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होणार आहे. परिणामी, मोठ्या प्रमाणावर वित्तहानी व जिवीत हानी होण्याची दाट शक्यता आहे. ही हानी टाळण्यासाठी जहाज त्वरित हलविण्यात यावे, अशी ग्रामस्थांनी आज प्रशासनाकडे मागणी केली.       

मिर्‍या ग्रामस्थांच्या मदतीने सागरी सीमा मंचाने आज दुपारी प्रादेशिक बंदर अधिकारी शंकर महानवर यांची भेट घेऊन प्रशासनाचे लक्ष वेधले. एम. टी. बसरा स्टार जहाजाकडे प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला. प्रादेशिक बंदर अधिकारी शंकर महानवर यांना निवेदन देण्याकरिता सागरी सीमा मंच कोकण प्रांत प्रमुख संतोष पावरी, दक्षिण रत्नागिरी जिल्हा प्रमुख स्वप्निल सावंत, सागरी सीमा मंच रत्नागिरी तालुका प्रमुख अतुल तथा बाबा भुते, सामाजिक कार्यकर्ते राजीव कीर यांच्यासह मिर्‍या ग्रुप ग्रामपंचायत सदस्य व सागरी सीमा मंच महिला सदस्य सौ. तनया शिवलकर, व भाटीमिर्‍या येथील ग्रामस्थ महेश तळेकर, विजय तळेकर, शशिकांत सनगरे, सुरेश लाखण आदी उपस्थित होते.       

जहाजाचे नाव व रजिस्ट्रेशन नंबर संबंधित संकेतस्थळावर मालकाचे नाव व माहिती उपलब्ध होऊ शकते. तरीही 3 दिवसांत संबंधित प्रशासकीय अधिकार्‍यांना मालकाचा पत्ता मिळू शकला नाही, हे दुर्दैव असल्याची खंत, सागरी सीमा मंचाचे कोकण प्रांत प्रमुख संतोष पावरी यांनी व्यक्त केली.