देवरूख:- काजू बी पैसे व्यवहारावरून दोन तरूणांमध्ये बाचाबाची होऊन त्याचे रूपांतर मारीमारीमध्ये झाले आणि यातूनच ओझरे गवळीवाडी येथील तरूणाचा खून झाला. ही खळबळजनक घटना संगमेश्वर तालुक्यातील आंबवकोंड कदमराव कातळवाडी येथे शुक्रवारी रात्री घडली. आरोपीवर गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे. त्याचबरोबर खुनासाठी वापरण्यात आलेली लोखंडी कोयती पोलिसांनी जप्त केली आहे.
देवरूख पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, संदीप विठ्ठल केदारी (रा. ओझरे खुर्द गवळीवाडी, वय ४३ ) असे खून झालेल्या तरूणाचे नाव आहे. तर संतोष शंकर घाटे (रा. आंबव कोेंडकदमराव कातळवाडी, वय ४४ वर्षे) असे आरोपीचे नाव आहे. दिलेल्या फिर्यादीनुसार संदीप केदारी व संतोष घाटे हे मित्र शुक्रवारी रात्री घाटे यांच्या घराच्या अंगणात बसले होते. यावेळी काजू बीच्या पैशाच्या वाटणी व्यवहाराबाबत चर्चा करत होते. काही वेळाने या चर्चेला वेगळे वळण लागले.
पैशाच्या वाटणीवरून दोघांमध्ये बाचाबाची झाली. आणि याचे रूपांतर मारामारीत झाले. संतोष घाटेचा रागाचा पारा चढल्याने त्याने लोखंडी कोयतीने संदीप याच्या डोक्यावर व कानाच्या खालील बाजूस असे पाच वार केले. लागोपाठ झालेल्या पाच वारामुळे संदीप हा रक्ताच्या थारोळ्यात पडून जागीच मृत झाला. ही घटना शुक्रवारी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास आंबव कातळवाडी येथे आरोपीच्या अंगणामध्ये घडली आहे. याबाबत गावचे पोलीस पाटील प्रकाश तुकाराम पांचाळ यांनी फिर्याद दिली आहे.