बीएएमएस वैद्यकीय अधिकाऱ्यांना सेवेत कायम करून मानधन वाढ करा

रत्नागिरी:- कोरोनासारख्या आजाराचा सामना करण्यासाठी बीएएमएस वैद्यकीय अधिकारी अथक मेहनत घेत आहेत. शासनाने कंत्राटी व बंधपत्रित वैद्यकीय अधिकारी यांच्या मानधनात वाढ करण्याचा निर्णय घेतला असून या शासन निर्णयामध्ये फक्त एम. बी. बी. एस. वैद्यकीय अधिकारी यांचा उल्लेख करण्यात आला आहे. याच धर्तीवर वैद्यकीय अधिकारी गट-अ या पदावर काम करणार्‍या बी.ए.एम.एस. वैद्यकीय अधिकारी यांच्या मानधन वाढ व सेवेत कायम करण्याची मागणी बीएएमएसम वैद्यकीय अधिकार्‍यांनी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री ना. उदय सामंत यांच्याकडे केली आहे.
कोविड १९ चा सामना करण्यासाठी बीएएमएस वैद्यकीय अधिकारी गट-अ देखील तेवढ्याच तत्परतेने व जोखीम घेऊन सेवा देत आहेत त्यामळे मानधन वाढीचा निर्णयामध्ये आमच्याही मानधन वाढीचा निर्णयात समावेश करावा अशी मागणी त्यांनी केली आहे.
राज्यातील कोविड १९ च्या संकटामध्ये कोकणातील ग्रामीण भागात काम करणारे बीएएमएस १४३ वैद्यकीय अधिकारी गट- अ (रत्नागिरी जिल्हा ९५ व सिंधुदुर्ग जिल्हा ४८) यांच्याकडून उपचारात्मक तसेच प्रतिबंधात्मक आरोग्य सेवा दिवस रात्र दिली जात आहे. कमी मानधनामध्ये स्वत:च्या जीवाची पर्वा न करता कोणताही जोखीम अथवा तत्सम भत्ता नसतानाही अविरत रुग्ण सेवा देत आहे. या सर्व आपत्ती व्यवस्थापनाबरोबर प्राथमिक आरोग्य केंद्राची महत्वाची नियमित लसीकरण सेवा, सर्व राष्ट्रीय कार्यक्रम तसेच पाणी तपासणी, मीठ नमुने तपासणी, या सर्व गोष्टीही नियमित चालू ठेवल्या असून कुशलतेने हाताळत आहेत. सर्व क्षेत्र भेटी देखील भत्ते मिळत नसताना सर्व वैद्यकीय अधिकारी सेवा बजावत आहेत यांचा विचार करताना जाचक अटी काढून टाकून सेवेत कायम करावे अशी मागीणी करण्यात आली आहे. यावेळी डॉ. अनिरुद्ध लेले, डॉ.अनुराधा लेले यांच्यासह वैद्यकिय अधिकारी उपस्थित होते.