रत्नागिरी:- पावसापुर्वीची तयारी म्हणून पत्तन विभागाने जानेवारी महिन्यात मिर्या बंधार्यांचा सर्व्हे केला. पावसाळ्यात जास्त धोका किंवा वाहुन जाणारे सात धोकादायक स्पॉट निश्चित केले. त्याच्या दुरूस्तीचा सुमारे 98 लाखाचा प्रस्ताव तयार करून जिल्हा प्रशासन सादर केला. मात्र निसर्ग चक्रीवादळामुळे धोकादायक स्पॉट वाहुन जाऊन बंधार्याला भगदाड पडले आहे. समुद्राचे पाणी कधी शेड किंवा घरात शिरेल याचा नेम नाही. रात्र भितीने जागुन काढावी लागत आहे. मात्र जिल्हा प्रशासन आणि शासन निद्रिस्त अवस्थेत आहे. चार महिने झाले, तरी दुरुस्ती प्रस्ताव धुळ खात पडला आहे. त्यामुळे मिर्यावासीयांमध्ये प्रचंड नाराजीचे वातावरण आहे.
साडेतीन किमीच्या या बंधार्याला पावसाळ्यात सात ठिकाणी भगदाड पडण्याची शक्यता पत्तन विभागाने चार महिन्यापुर्वी वर्तविली होती. ते सात धोकादायक स्पॉट दगड भरून सुरक्षित करण्यासाठी सुमारे 98 लाखाचा प्रस्ताव तयार केला होता. निधीसाठी जिल्हा प्रशासन आणि शासनाला प्रस्ताव सादर केला आहे. पंधरामाड, भाटीमिर्या, जाकीमिर्या, आलावा या ठिकाणी हे सात स्पॉट आहेत. मिर्या धुपप्रतिबंधक बंधार्याची गेल्या दोन वर्षांमध्ये प्रचंड वाताहत झाली आहे. पंधरामाड येथील बंधार्याची उधाणाच्या भरतीत हानी झाली. येथील बंधार्यासह या भागातील पालिकेचा रस्ता वाहून गेला. तसेच अन्य ठिकाणीही बंधार्याला भगदाड पडले. मिर्यावासीयांच्या उपोषणानंतर पक्क्या बंधार्यासाठी 190 कोटी मंजुर झाले. मात्र हा बंधारा पुर्ण होण्यासा काही वर्षे जाणार आहेत.
यंदाच्या पावसात उधाणाच्या भरतीने बंधार्याची धुप होण्याच्या शक्यतेने बंंधार्याचा सर्व्हे करून तत्काळ दुरूस्तीबाबत खबरदारी घ्या, त्याला लागणारा निधी देऊ, अशा सूचना तत्कालीन जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी दिल्या होत्या. त्यानुसार पत्तन विभागाने सर्व्हे करून पंधरामाड येथे 1, भाटीमिर्या 3, जाकीमिर्या 2 आणि आलावा 2 हे सात स्पॉट निश्चित केले. पावसापुर्वी या ठिकाणांची दुरूस्ती करणे आवश्यक होते. मिर्या येथील काही ग्रामस्थांना दुरूस्तीबाबत मागणीही केली होती. परंतु प्रशासनाला काही जाग आली नाही. निसर्ग चक्रीवादळाच्या तडाख्यात पुन्हा मिर्या बंधारा ठिकठिकाणी वाहुन त्याला भगदाड पडले आहे. समुद्राचे पाणी मानवी वस्तीत शिरण्याची शक्यता आहे. चार महिन्यापूर्वी प्रस्ताव देऊनही जिल्हा प्रशासनाने याकडे कानाडोळा केल्याने मिर्यावासीयांचा जीव आता धोक्यात आला आहे.