निसर्ग चक्रीवादळात कशेळी-बावकरवाडी येथील मच्छीमार नौका नष्ट

राजापूर:- निसर्ग चक्रीवादळाचा फटका कशेळी- बावकरवाडी येथील मच्छीमार सुनिल दिनकर फणसे यांना बसला आहे. समुद्र किनारी लावलेल्या मच्छीमारी नौकेवर समुद्राच्या अजस्त्र लाटा आदळल्यामुळे ही मच्छीमारी नौका पूर्णतः नष्ट झाली आहे. सुमारे ६० ते ७० हजाराच्या आसपास या मच्छीमाऱ्याचे नुकसान झाले आहे.

याची माहिती कशेळीचे महात्मा गांधी तंटामुक्त गाव समितीचे अध्यक्ष शशिकांत वारीशे यांना देण्यात आली. वारीशे यांनी याबाबत मत्स्यव्यवसाय विभागाचे अधिकारी आणि तलाठी यांच्याशी संपर्क साधून सदरच्या घडलेल्या घटनेची माहिती दिली. आज शुक्रवार ता.५ जून रोजी साखरीनाटे येथील मत्स्यव्यवसाय विभागाचे परवाना अधिकारी जीवन सावंत, कशेळी सजाचे तलाठी ताकवले, सुरक्षा रक्षक प्रथमेश कुबडे यांनी घटनास्थळी भेट देऊन ‘त्या’ मच्छीमार नौकेचा पंचनामा केला. या घटनेमुळे या मच्छीमाऱ्याचे सुमारे ६० ते ७० हजाराच्या आसपास नुकसान झाले आहे. यावेळी तंटामुक्त समितीचे अध्यक्ष शशिकांत वारीशे,पोलीस पाटील प्रमोद सुतार, ग्रामपंचायत सदस्य अनंत फणसे उपस्थित होते.