जिल्ह्यात 396 कर्मचाऱ्यांना मिळणार प्रोत्साहन अनुदान

रत्नागिरी:- कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी गावांमध्ये काम करणार्‍या आरोग्य विभागाच्या आशा गटप्रवर्तक तसेच अर्धवेळ स्त्री परिचर यांना त्यांच्या कामाची दखल घेतली आहे. त्यांना प्रत्येकी १ हजार रुपये इतकी प्रोत्साहनपर रक्कम देण्याचा निर्णय शासनाने घेतला असल्याने रत्नागिरी जिल्ह्यातील ७३ गट प्रवर्तक व ३२३ अर्धवेळ परिचारिका यांना याचा लाभ मिळणार आहे. 

कोरोनाच्या संकटकाळात कोविड योद्धा म्हणून काम करणार्‍यांमध्ये आशा सेविका, आशा गटप्रवर्तक व अर्धवेळ स्त्री परिचर यांचादेखील समावेश आहे. ते दिवसरात्र कोरोना महामारीच्या संकटाचा मुकाबला करीत आहेत. गावपातळीवरील हे कर्मचारी म्हणजे कोरोना विषाणुविरुद्ध लढणारे योद्धेच आहेत. या कर्मचार्‍यांच्या कामाची दखल घेऊन त्यांना प्रत्येकी १ हजार रुपये प्रोत्साहनपर अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पण यामध्ये आशा गटप्रवर्तक तसेच अर्धवेळ स्त्री परिचर बाकी होते. आता या कर्मचार्‍यांनाही प्रोत्साहनपर रक्कम देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. चालू महिन्यामध्येच या कर्मचार्‍यांना रकमेचे वाटप करण्याचे निर्देश जिल्हा परिषदांना देण्यात आले आहेत.

जिल्ह्यात १२७२ आशा सेविका, ७३ आशा गटप्रवर्तक तर ३२३ अर्धवेळ परिचारिका काम करीत आहेत. गेले दोन महिने गावागावात, वाडीवस्तीवर आरोग्य सर्वे करून बाहेरून येणारे व होम क्वारंटाईन असलेल्यांची तीनवेळ चौकशी करण्याचे काम यांच्याकडून केले जात आहे. शासनाने घेतलेल्या निर्णयामुळे जिल्ह्यातील आशा गटप्रवर्तक व अर्धवेळ परिचारिका यांना सुखद दिलासा मिळाला आहे.

कोरोनाविरुद्ध काम करणार्‍या ग्रामपंचायत कर्मचार्‍यांनाही दिलासा देण्यात आला असून त्यांच्या वेतनासाठी असलेली ग्रामपंचायत करवसुलीची अट रद्द करण्यात आली आहे. यापुर्वी या कर्मचार्‍यांचे वेतन हे ग्रामपंचायत करवसुलीशी निगडीत होते. पण आता करवसुलीची अट रद्द केल्यामुळे ग्रामपंचायत कर्मचार्‍यांना सन २०२० -२१ या वर्षात त्यांचे संपूर्ण वेतन मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.