ना. सामंत दोन दिवसांचा दौरा करणार
रत्नागिरी:- निसर्ग चक्रीवादळाने जिल्ह्यातील किनारपट्टीला मोठा फटका बसला आहे. जिल्ह्यात अंशत व पूर्णतः अशा 27 हजार 782 घरांची पडझड झाली आहे. यामध्ये शासकीय इमारतींचाही समावेश आहे. सर्वाधिक नुकसान मंडणगड, दापोली, गुहागर तालुक्याचे झाले आहे. या तालुक्यांचा उद्यापासून दोन दिवस मी दौरा करणार आहे, अशी माहिती उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत दिली.
जिल्ह्यात गुहागर, दापोली, मंडणगड या तालुक्यांना मोठा फटका बसला आहे. त्यापैकी दापोली तालुक्याचे मोठे नुसकान झाले आहे. पडझडीमध्ये मंडणगडमध्ये 800 घर, खेड 567, गुहागर 196, चिपळुण 322, संगमेश्वर 48, रत्नागिरी 629, लांजा 6, राजापूर 14 अशी एकूण 27 हजार 782 घरांची पडझड झाल्याचा प्राथमिक अहवाल आहे. यामध्ये आणखी मोठी वाढ होणार आहे.
नुकसान दृष्टीक्षेपात
* जिल्ह्यात वादळामध्ये 6 जखमी
* 11 जनावरांचा मृत्यू
* 3 हजार 200 झाडे पडली
* 930 विद्युत खांब पडले
* शेतीचेही मोठे नुकसान
* 41 शासकीय इमारतींची पडझड