वादळानंतर जिल्ह्यात नुकसानीचा महापूर

कोट्यवधींचे नुकसान; पंचनामे करण्याचे आदेश

रत्नागिरी:- निसर्ग चक्रीवादळाच्या तांडवात दापोली, मंडणगड तालुक्यासह जिल्ह्यात कोट्यवधीचे नुकसान झाले आहे. दापोलीमधील काही गावातील 95 टक्के घरांना फटका बसला असून दुरुस्ती आणि पंचनामे करण्याचे कामे युध्दपातळीवर सुरु आहे. विजेचे खांब, वाहिन्या तुटल्यामुळे दोन्ही तालुक्यातील वीजपुरवठा खंडित झाला आहे. वादळ सरले असले तरही गुरुवारी थांबून थांबून पाऊस सुरु होता.

गुरुवारी (ता. 4) सकाळी 8.30 वाजेपर्यंतच्या चोविस तासात जिल्ह्यात सरारसरी 93.44 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. त्यात मंडणगड 130,  दापोली 125, खेड 76, गुहागर 77, चिपळूण 102, संगमेश्वर 73,  रत्नागिरी 40, लांजा 131, राजापूर 87 मिमी पाऊस झाला. निसर्ग चक्रीवादळाचे केंद्रबिंदू अलिबाग असल्यामुळे त्यापासून काही अंतरावर असलेल्या रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड,  दापोली, गुहागर तालुक्यांना जबदरस्त तडाखा बसला. फयानपेक्षाही अधिक घरांचे नुकसान झाले आहे. चक्रवादळाने तांडव लागले आहे. गावेच्या गावे वेगवान वार्‍यामुळे उध्वस्त झाली आहेत. एकीकडे मुसळधार पाऊस आणि दुसरीकडे घरावरची कौले, पत्र कागदासारखी उडून जमीनिवर कोसळत होती. छतच राहीलं नाही, त्यामुळे मिळेल तिथे आधार घेत कुटुंबातील ही मंडळी उघड्या डोळ्यांनी झालेले नुकसान पाहत होती.

पावसाचे पाणी घरातील मांडलेला संसार उध्वस्त करत होते. हे चित्र या तीन तालुक्यातील सर्वाधिक पाहायला मिळाल. विजेचे खांब कोसळल्यामुळे पुरवठा खंडित झाला आहे. मोबाईल टॉवर कोसळल्यामुळे नेटवर्कही गायब झालेले होते. दापोली तालुक्यातील कजिवली येथील मनोहर चव्हाण यांच्याशी काजू, आंब्याच्या झाडांचे मोठे नुकसान झाले आहे. हर्णे बंदराजवळील नाडे गावातील सुमारे 80 घराचे या वादळात नुकसान झाले. पाजपंढरीतील दोन जण वादळात जखमी झाले आहेत. आगरवायगणीतील वीरेंद्र येलंगे यांच्या बैल तर आंजर्ले तील राजेश बोरकर यांची गाय मृत झाली आहे. आंजर्लेतील मंगेश महाडिक याच्या सुमारे 48 कोंबड्या मृत पावल्या आहेत. आवाशी येथील 6 घरांचे नुकसान झाले आहे. जालगाव येथील नरेंद्र बर्वे या बागायतदारांचे मोठे नुकसान झाले आहे. सुमारे 500 पोफळी,  20 आंबा कलमे,  सहा फणस झाडे पडली आहेत. वार्‍यामुळे झाडावरील आंबा जमिनीवर पडून नुकसान झाले आहे. चिपळूण तालुक्यातील 14 रस्त्यांवरील वाहतूक झाड पडून बंद झाली होती. त्या ठिकाणी सार्वजनिक बांधकाम विभागाने झाडे हटवून वाहतूक सुरळीत केली आहे. चिपळूण येथील शासकीय गोदामाच्या छतावरील पत्रे वादळी वार्‍याने उडून अंशत: नुकसान झाले. चिपळूण 1 रस्ता, खेड 2 रस्ता एकेरी वाहतूक सुरु आहे. मंडणगड-म्हाप्रळ रस्त्यावर झाडे हटवून रस्ता मोकळा करण्यात आले आहे.

वादळाच्या पार्श्‍वभुमीवर मंडणगड तालुक्यात नारायणनगर, वेळास, बाणकोट व वाल्मिकीनगर या चार गावांतील लोकांचे प्रशासनाकडून स्थलांतर करण्यात आले होते. त्या चारही गावात झाडे कोसळून पडणे, घरावरील कौले व पत्रे उडून गेले होते. वाडे कोसळणे, घरे पडणे, इमारतीवर छप्परे उडून जाणे असे प्रकार मोठ्याप्रमाणात झाले आहे. वादळामुळे झाडे उन्मळून पडली होती. गावांचा संपर्कही तुटला होता. तालुक्यात तीन हजाराहून अधिक विज खांब तुटल्याने खंडीत झालेला विज पुरवठा पुढील दहा दिवसात पुर्ववत होण्याची शक्यता नाही. स्थानीक महसुल प्रशासन यासंदर्भात नुकसानीचे पंचनामे करीत असून तालुक्यातील वीज पाणी व दुरसंचार सेवा सुरळीत होण्यासाठी दोन ते तीन दिवस लागणार आहेत. मंडणगड तालुक्यातील 109 गावातील शेकडो घरांची छप्परे तुटलेली होती. महसुल विभागामार्फत पंचनामे सुरु आहेत. या व्यतिरिक्त संगमेश्‍वर, रत्नागिरी, लांजा, राजापूर या तिन तालुक्यांमध्ये झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम सुरु आहे. रत्नागिरी जिल्हाधिकार्‍यांच्नी सांगितले की, दापोली व मंडणगडमध्ये जास्त नुकसान झाले आहे. 3 हजार झाडे पडली आहेत. 14 सबस्टेशन, 1962 ट्रान्सफॉर्मर विजेचे खांब पडले आहेत, पाणीपुरवठ्याची व्यवस्था काही ठिकाणी विस्कळीत झाली आहे अशी माहितीही त्यांनी दिली.