वटपौर्णिमेलाही कोरोनाचा फटका; सावित्रींना घरीच करावी लागणार पूजा

रत्नागिरी:- जन्मोजन्मी हाच पती मिळावा यासाठी वटवृक्षाची विधीवत पूजा करून रितीरिवाज जपणार्‍या सावित्रींना कोरोनाचा फटका बसला आहे. सोशल डिस्टन्सिंग राखण्यासाठी आता आपापल्या घरीच पूजा करून जन्मोजन्मी हाच पती मिळो अशी प्रार्थना यावर्षी करावी लागणार आहे.

हिंदू धर्मात वटसावित्रीच्या दिवसाला फार महत्व आहे. याच दिवशी सावित्रीने यमदेवांकडून आपल्या पतीचे प्राण परत आणले होते. ही घटना ज्येष्ठ पौर्णिमेला घडली. तेव्हापासून पतीच्या प्राणांचे रक्षण व्हावे आणि आपल्या पतीला दीर्घायुष्य लाभावे, यासाठी सुवासिनी महिला पौर्णिमेच्या दिवशी सावित्रीसारखे व्रत करतात. सावित्रीने आपल्या पतीची सेवा वडाच्या झाडाखाली केली. तेथेच यमदेवांनी सत्यवानाला त्याचे आयुष्य परत दिले. त्यामुळे वडाच्या झाडाचे पूजन केले जाते. ज्येष्ठ पौर्णिमा ही वटपौर्णिमा नावाचे ओळखली जाते. सुवासिनी महिला या दिवशी वडाच्या झाडाची मनोभावे पूजा करतात.

यावर्षी शुक्रवार दि. ५ जून रोजी वटपौर्णिमा आहे. पौर्णिमा प्रारंभ ५ जून २०२० रोजी उत्तर रात्रौ ३ वाजून १५ मिनिटे अशी आहे. तर पौर्णिमा समाप्ती ६ जून २०२० रोजी रात्री १२ वाजून ४२ मिनिटांनी होणार आहे. मात्र यावर्षी कोरोनाचे संकट वटपौर्णिमेवर आले आहे. या दिवशी सुहासिनी महिला एखाद्या मंदिरातील वटवृक्षाची विधीवत पूजाअर्चा करतात. महिलांची मोठी गर्दी अशा ठिकाणी होत असते. मात्र कोरोनामुळे वटपौर्णिमेच्या उत्साहावर पाणी फेरले आहे. सोशल डिस्टन्सिंग राखण्यासाठी सुहासिनींनी यावर्षी आपल्या घरातच पूजाअर्चा करावी अशा सूचना आल्या आहेत.