निसर्ग चक्रीवादळाचा महावितरणला तडाखा

रत्नागिरी:- अरबी समुद्रात तयार झालेल्या ‘निसर्ग’ चक्रीवादळाने कोकण किनारपट्टीला जबरदस्त तडाखा दिल्याने महावितरणचे मोठे नुकसान झाले आहे. चक्रीवादळाचा सर्वाधिक तडाखा खेड व चिपळूण या विभागाला बसला असून, वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी महावितरणला शर्थीचे प्रयत्न करावे लागत आहेत. दरम्यान, नागरिकांनी संयम राखून यंत्रणा पूर्ववत करण्यासाठी महावितरणला वेळ द्यावा असे आवाहन रत्नागिरीचे अधीक्षक अभियंता देवेंद्र सायनेकर यांनी केले आहे. 

मंडणगड पासून राजापूर परिसरामधील अनेक उपकेंद्रांना वीज पुरवठा करणाऱ्या 33 केव्ही वाहिन्या व उपकेंद्रातून निघणाऱ्या 11 केव्ही वाहिन्यांवर अनेक ठिकाणी मोठे वृक्ष उन्मळून पडल्याने विजेचे शेकडो खांब जमीनदोस्त झाले आहेत. ताराही तुटल्या आहेत.  गुहागर, दापोली, मंडणगड या तालुक्यात वीज यंत्रणेचे मोठे नुकसान झाले आहे. या नादूरुस्त यंत्रणेचा व वाहिन्यांचा आढावा घेण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. प्रत्येक वाहिनी सुस्थितीत असल्याची खात्री झाल्याशिवाय वीजपुरवठा पूर्ववत करणे जोखीमीचे आहे. त्यामुळे खंडित वीजपुरवठा पूर्ववत करण्यासाठी काही कालावधी लागणार आहे.
 

महावितरणची संपूर्ण यंत्रणा पूर्ण क्षमतेने कामाला लागली असून सर्वप्रथम उपकेंद्रांचा वीजपुवठा सुरु केला जाईल व तेथून पुढे टप्प्या-टप्प्याने 11 केव्ही व लघुदाब वाहिन्यांचा वीजपुरवठा सुरळीत करावा लागणार आहे. रत्नागिरी शहरासह बऱ्याच शहरांचा वीजपुरवठा सुरू करण्यात यश आले आहे. यापूर्वी ‘फयान’ चक्री वादळ असो किंवा तिवरे धरण दुर्घटना अशा प्रसंगी महावितरण कर्मचाऱ्यांनी नेटाने काम करून वीजपुरवठा युद्धपातळीवर पूर्ववत करण्याची यशस्वी कामगिरी केली आहे. परंतु, यावेळचे संकट त्याहून मोठे आहे. त्यामुळे नुकसानीचा अंदाज घाईने बांधणे उचित नाही. सर्व वीजग्राहकांना संयम बाळगून महावितरण कंपनीला सहकार्य करावे असे आवाहन अधीक्षक अभियंता देवेंद्र सायनेकर यांनी केले आहे.